
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेतील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम यंदाही अबाधित राहिला आहे. सचिनने 2003 च्या वर्ल्डकपमध्ये 673 धावा चोपल्या होत्या. सचिनच्या 16 वर्षापूर्वीच्या या विक्रमाच्या जवळपास अनेक खेळाडू पोहोचले, परंतु तो मोडण्यात त्यांना अपयश आले. सचिनच्या या विक्रमाच्या सर्वात जवळ टीम इंडियाचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा पोहोचला होता. परंतु सेमी फायनलमध्ये स्वस्तात बाद झाल्याने आणि फायनलला न पोहोचल्याने त्याने संधी गमावली.
कर्णधार विलियम्सनने इतिहास रचला, जयवर्धनेचा विक्रम मोडला
सचिनने 2003 च्या वर्ल्डकपमध्ये 11 लढतीत 673 धावा चोपल्या होत्या. 16 वर्षापासून सचिनचा हा विक्रम अबाधित आहे. सचिनने 1 शतक आणि 6 अर्धशतकांच्या मदतीने सर्वाधिक धावा चोपल्या होत्या. यंदा रोहित हा विक्रम मोडीत काढणार असे वाटले होते. यंदाचा विश्वचषक रोहितसाठी खरोखर धावांचा रतीब घेऊन आला. रोहितने पाच शतकांसह 648 धावा चोपल्या.
रोहित शर्मासह ऑस्ट्रेलियाचा डेव्हीड वॉर्नर, इंग्लंडचा ज्यो रूट आणि न्यूझीलंडचा केन विलियम्सनही या रेसमध्ये होते. सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आले. या लढती वॉर्नरही स्वस्तात माघारी परतला होता. यंदा डेव्हीड वॉर्नरच्या नावावर 10 लढतीत 647 धावांची नोंद झाली. तसेच फायनलमध्ये रूट आणि विलियम्सन स्वस्तात बाद झाले. ज्यो रूटने 11 लढतीत यंदा 556 धावा केल्या, तर केन विलियम्सनने 10 लढतीत 578 धावा केल्या.






























































