तू शतक मार, मग मी हे बूट तुला देईल! सचिन आठवणीत रमला अन् प्रवीण आमरे भावूक झाले

टीम इंडियाचा माजी खेळाडू, भारतरत्न सचिन तेंडुलकरला आपण अनेकदा लहानपणीच्या आणि शालेय जीवनातील आठवणीत रमताना पाहिले आहे. लहानपणीचे किस्से, मैदानावर केलेली धमाल आणि मित्रांनी वेळोवेळी दिलेली साथ याबाबत तो अनेकदा भरभरून बोलतोही. आताही त्याने हिंदुस्थानचा माजी खेळाडू प्रवीण आमरेचा एक किस्सा सांगितला आहे. निमित्त होते ‘टेन एक्स यू’ या स्पोर्ट्स अॅथलेटिक ब्रँडच्या लॉन्चिंगचे.

आचरेकर सर यांच्या नेटसमध्ये मी साधे कॅनव्हॉस बूट घालून खेळत असायचो. तेव्हा सरांनी माझा मोठा भाऊ अजित याला सांगितले की, सचिनला आर्क स्पाईस बूट घ्यावे लागतील. त्यावेळी ते बूट नेमके असतात कसे हे ही माहिती नव्हते. पण, या बुटांना शोले चित्रपटातील ठाकूरच्या खिळ्यांच्या बुटांप्रमाणे मोठाले खिळे असतात असे कळले, असे सचिन म्हणाले.

सचिन पुढे म्हणाला की, प्रवीण आमरे त्यावेळी हिंदुस्थानच्या अंडर 19 संघाकडून ऑस्ट्रेलियात खेळून आलेला होता. सरांनी आम्हाला त्याची फलंदाजी पाहण्यास सांगितले. त्यावेळी माझे लक्ष त्याच्या स्टायलिश क्रिकेट बूटवर गेले. प्रवीणच्याही हे लक्षात आले आणि त्याने सांगितले की, तू शतक मार मग हे बूट मी तुला देईल.

शतक ठोकल्यानंतर प्रवीणकडून बूट मागण्याची माझी हिंमत होत नव्हती. तेव्हा प्रवीणने स्वत:हून मला ते बूट दिले. माझ्या आयुष्यातील ते सर्वात पहिले दर्जेदार बूट होते. ही गोष्ट मी कधीही विसरणार नाही. पुढे मी हिंदुस्थानकडून खेळताना अनेकदा ते बूट वापरले, असेही सचिन म्हणाला. यावेळी प्रवीण आमरेही भावूक झाले.

दरम्यान, हा ब्रँड बनवण्यासाठी दीड वर्ष लागले असून माझ्या क्रिकेट कारकिर्दीतील अनुभव वापरून हा ब्रँड बनवण्यात आला आहे. यासोबत आणखीही काही उत्पादने तयार केली असून ही कॉमन मॅनसाठी तयार केलेली उत्पादने आहेत. ही उत्पादने सर्वासामन्यही वापरू शकतात, यासाठी एथलिट असण्याची गरज नाही. आपल्या क्रीडाप्रेमी देशाचे क्रीडाराष्ट्रात रुपांतर करण्याचे ध्येय आहे, असे सचिन म्हणाला.