पृथ्वीची परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता अफलातून – सचिन तेंडुलकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

वेस्ट इंडीजविरुद्धच्या राजकोट येथील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच डावात शतक ठोकून कसोटी पदार्पण गाजवणाऱया पृथ्वी शॉचे ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर याने कौतुक केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये पृथ्वीचे कौतुक करताना सचिनने म्हटले आहे, पृथ्वीची बुद्धिमत्ता (स्मार्टनेस) आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता अफलातून असून हीच त्याच्या खेळाची ताकद आहे.

सचिन पुढे म्हणाला, कित्येक खेळाडूंचे पदार्पण धडाक्यात होते, मात्र पृथ्वीसारखा ठसा उमटवण्यात सगळेच यशस्वी होत नाहीत. प्रतिभा सगळय़ांकडेच असते, मात्र त्या प्रतिभेचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. पृथ्वीकडे गुणवत्ता ठासून भरली आहे. त्याची ही गुणवत्ता त्याच्या शिकण्याच्या प्रबळ इच्छेला इतरांपासून वेगळी करते. आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवायचे असेल तर हा गुण महत्त्वाचा ठरतो.

सचिनने पृथ्वीला सल्ला देताना म्हटले आहे की, क्रिकेटपटूची कारकीर्द जशी बहरत जाते तशी परिस्थिती आणि खेळात बदल होत जातो. पृथ्वीनेही त्याच्या खेळात वेळोवेळी बदल केला आहे. मात्र विनाकारण आपल्या खेळाची चिकित्सा करून खेळातील चुका त्याने शोधू नये. कालानुरूप खेळामध्ये बदल होत असतात.

सचिनने पुढे नमूद केले की, जवळपास दहा वर्षांपूर्वी मी पृथ्वीचा खेळ माझ्या एका मित्राच्या सांगण्यावरून पाहिला होता. त्यावेळीच मी हा भविष्यातील हिंदुस्थानी क्रिकेटपटू असून हा मुलगा एक दिवस हिंदुस्थानी संघातून खेळणार अशी भविष्यवाणी केली होती. हीच माझी आणि पृथ्वीची पहिली ओळख होती.