महाबळेश्वरमध्ये केशर क्रांती… राज्याच्या कृषी विभागाचा प्रयोग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश चुरी | मुंबई

महाराष्ट्राचे मिनी कश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्य़ा महाबळेश्वरमध्ये केशराच्या लागवडीचा प्रयोग शेतकऱ्य़ांनी यशस्वी करून दाखवला आहे. कश्मीर खोऱ्य़ातून मागवलेल्या केशराच्या कंदांना सह्याद्रीच्या मातीची ऊब चांगलीच मानवली आहे. क्षेत्र महाबळेश्वरमध्ये केशरांची रोप फोफावली आहेत. एका किलोमागे साडेतीन लाख रुपये दर मिळणाऱ्य़ा या केशराच्या पिकामुळे महाबळेश्वरची अर्थव्यवस्थाच बदलून जाण्याची चिन्हे आहेत.

आज सर्वत्र किसान दिवस साजरा करण्यात येत आहे. या दिवसाच्या निमित्ताने केशर लागवडीची यशोगाथा पुढे आली आहे. राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणारे महाबळेश्वर स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. पण लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्य़ांवर स्ट्रॉबेरी पाच ते सहा रुपये किलो दराने विकण्याची वेळ आली. यात शेतकऱ्य़ांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्य़ांना शाश्वत उत्पन्न देण्याची योजना महाबळेश्वरचे कृषी सहाय्यक दीपक बोर्डे यांनी आखली. समुद्रसपाटीपासून सुमारे दीड हजार मीटर उंचीवर केशराची लागवड होते. केशराचे कंद उगवण्यासाठी 20 ते 25 अंश सेल्सिअस वातावरण आणि फुले येण्याच्या कालावधीत 10 ते 12 अंश सेल्सिअस तापमानाची गरज आहे. महाबळेश्वरमध्ये उंची तापमान केशर लागवडीसाठी योग्य असल्याचे लक्षात आल्यावर दीपक बोर्डे यांनी सुरुवातीला स्वतःच्या खिशातून खर्च करून कश्मीर खोऱ्य़ातून कंद मागवले आणि महाबळेश्वरमधील गणेश जांभळे व मेटगुताड गावातील दिलीप बावळेकर  व अशोक बावळेकर यांच्या शेतात केशराचे कंद लावले. पुढे या शेतकऱ्य़ांनी केशराच्या कंदाच्या रकमेची परतफेडही केली.

केवळ महाबळेश्वर नव्हे तर अकोले,  भंडारदरा, कळसुबाई डोंगर, इगतपुरी, सापुतारामध्येही केशर लागवडीचा प्रयोग यशस्वी होऊ शकतो. भाभा अणुशक्ती केंद्रानेही केशर लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला आहे.  – दीपक बोर्डे,कृषी सहाय्यक, महाबळेश्वर

शंभर नंबरी केशर

कंदाला काही दिवसांतच कोंब आल्यावर शेतकरी व कृषी खात्यातील अधिकाऱ्य़ांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता रोपे बहरली. आठ-दहा दिवसांपूर्वीच केशराच्या रोपांना कळ्या आल्या होत्या. खात्री करून घेण्यासाठी कळ्या खुडल्या. आतील ‘किंजल्क’ म्हणजेच केशर दुधात टापून पाहिले तेव्हा कश्मीरप्रमाणे 100 टक्के केशर असल्याची खात्री पटली. कृषी विभागाने या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

अर्थव्यवस्था बदलेल

स्ट्रॉबेरीचा दर एका किलोमागे चारशे ते सहाशे रुपये मिळतो. पण एक किलो केशरचा दर साडेतीन लाख रुपये आहे. त्यामुळे या भागातील अधिकाधिक जमीन केशर लागवडीखाली आली तर महाबळेश्वरची अर्थव्यवस्थाच बदलून जाईल.