विमानतळावरून बेपत्ता झालेल्या परदेशी नागरिकाला शोधून काढले, पहिल्यांदाच आले होते मुंबईत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दहा दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हरवलेल्या ज्येष्ठ नागरिकाला अखेर सहार पोलिसांनी शोधून काढले. धर्मलिंगम पिल्लई असे त्यांचे नाव आहे. पिल्लई यांना विसरभोळेपणाचा आजार आहे. त्याना वैद्यकीय तपासणी करून मुलीच्या स्वाधीन केले. सहार पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

धर्मलिंगम हे दक्षिण आफ्रिकेच्या दरबान येथील रहिवासी आहेत. त्यांना हिंदुस्थानात फिरण्यासाठी यायची अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. पिल्लई यांना विसरभोळेपणाचा आजार असल्याने त्याना त्यांची मुलगी एकटी सोडत नसायची. पिल्लईंनी त्यांची मुलगी रिबेकाला विनंती केल्यानंतर ते दोघे बापलेक 29 जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले.

प्रवासात थकवा आल्याने रिबेका आणि धर्मलिंगम हे विमानतळ परिसरात बसले. रिबेकाला झोप लागल्यानंतर धर्मलिंगम हे विमानतळ परिसरातून निघून गेले. काही वेळाने रिबेकाला जाग आली तेव्हा धर्मलिंगम हे जागेवर नव्हते. रिबेकाने विमानतळ परिसरात शोध घेतला. धर्मलिंगम हे बेपत्ता झाल्याप्रकरणी तिने सहार पोलीस ठाण्यात धाव घेतली.

धर्मलिंगमच्या शोधासाठी विशेष पथक तयार केले. परिमंडळ 8 चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. पोलिसांनी आणि रिबेकानेदेखील धर्मलिंगम याचे पोस्टर सर्वत्र लावले होते. तपासादरम्यान पोलिसांनी अंधेरी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. काही फेरीवाल्यांकडेदेखील चौकशी केली. तो व्यक्ती लोकलमध्ये जातात, तर कधी कुर्ला, अंधेरी या परिसरात फिरताना दिसल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. धर्मलिंगम यांची माहिती मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना दिली. आज सकाळी धर्मलिंगम हे खार परिसरात दिसले. सहार पोलिसांचे पथक खार येथे गेले व त्यांनी धर्मलिंगम यांना ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यांना रिबेका हिच्या स्वाधीन केले.