94 व्या साहित्य संमेलनासाठी लोकहीतवादी मंडळाची अनोखी स्पर्धा; बोधचिन्ह, घोषवाक्य मिळवून देणार आकर्षक बक्षीस

तब्बल पंधरा वर्षांनंतर नाशिक नगरीला पुन्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजनाचा मान मिळाला आहे. या मार्चअखेर होणाऱया साहित्य संमेलनाची प्रथमदर्शनी ओळख ठरणारे घोषवाक्य व बोधचिन्ह साकारण्यासाठी लोकहितवादी मंडळाने स्पर्धा आयोजित करून आगळीवेगळी संधी उपलब्ध करून दिली.

स्पर्धेत भाग घेणाऱया विजेत्यांना रोख स्वरूपात पारितोषिक देण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या 18 जानेवारीपर्यंत हे बोधचिन्ह व घोषवाक्य तयार करून मंडळाकडे जमा करावे, असे आवाहन अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी केले आहे.

यंदा नाशिक जिल्हा निर्मितीला 151 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे गोदाकाठी होणाऱया या 94 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून शहराचा इतिहास, कर्तृत्व जगासमोर मांडता येणार आहे. प्रत्येक संमेलनाची प्रथमदर्शनी ओळख होते ती त्या संमेलनासाठी केलेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याने.

त्यामुळे नाशिकची समृद्ध ओळख घडवून देणारे बोधचिन्ह आणि घोषवाक्य साकारावे, यासाठी मंडळाने स्पर्धा आयोजित केली आहे. घोषवाक्य मोजक्या शब्दात आणि मराठी भाषेतील असावे, बोधचिन्ह एकरंगी, बहुरंगी असावे अशी अपेक्षा आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

विजेत्यांना मिळणार रोख पारितोषिक

स्पर्धकांनी तयार केलेले बोधचिन्ह व घोषवाक्य 18 जानेवारीपर्यंत जमा करावे, या स्पर्धेत अठरा वर्षांवरील हिंदुस्थानी नागरिक किंवा समूह सहभागी होऊ शकतात. बोधचिन्ह चार चौरस सेंटीमीटर एवढय़ा आकाराचे हवे. जेपीईजी, जेपीजी, पीएनजी, एसव्हीजी प्रकारात abmss [email protected]  या इमेल आयडीवर पाठवावे. त्यासोबत स्पर्धकाने स्वतःची संपूर्ण माहिती, फोटो द्यावा, विजेत्यांना रोख स्वरूपात पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव सुभाष पाटील यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या