साईबाबांची ‘प्रकटभूमी’ धूपखेडाच! मंदिर संस्थान व ग्रामस्थांचा दावा

855

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर साईबाबा जन्मस्थळाचा वाद संपुष्टात आला आहे. दरम्यान, पैठण तालुक्यातील धूपखेडा येथे साईबाबांचे वास्तव्य होते व तेथून एका वऱ्हाडासोबत ते शिर्डीला गेले. तेथेच रमले आणि कर्मभूमी शिर्डीतच समाधी घेतली, असा दावा करत येथील साई मंदिर विश्वस्त मंडळासह ग्रामस्थांनी सरकारकडे ‘धूपखेडा प्रकटभूमी’ विकासासाठी 100 कोटींच्या निधीची मागणी केली आहे.

परभणी तालुक्यातील पाथरी येथील साईबाबा मंदिर परिसर विकासासाठी राज्य शासनाने 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आणि शिर्डी संस्थानसह ग्रामस्थांनी यावर आक्षेप घेत बंद पुकारला होता. साईबाबा जन्मस्थळाचा वाद पेटला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘श्रद्धे’चा हा वादंग ‘सबुरी’ने मिटवला.

दरम्यान, साईबाबांचे जन्मस्थान नव्हे तर ‘प्रकट स्थान’ समोर आले आहे. साईबाबा पैठण तालुक्यातील धूपखेडा येथेच पहिल्यांदा दिसले. प्रकट रूपात येथे साईबाबांचे वास्तव्य होते. येथूनच ते शिर्डीला गेल्याचा दावा धूपखेडा येथील साईबाबा मंदिर विश्वस्त संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग वाघचौरे यांनी केला आहे. त्यामुळे साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद संपुष्टात आला असला तरी ‘पवित्र वास्तव्या’चा संदर्भ असलेल्या प्रकटस्थळाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

साईबाबांच्या जन्मस्थळाविषयी माहिती देताना धूपखेडा येथील साईबाबा मंदिर संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग वाघचौरे यांनी सांगितले की, ‘साईबाबा हे धूपखेडा येथे प्रगट झाले होते. त्यांनी येथील लिंबाच्या झाडाखाली अनेक दिवस वास्तव्य केले. या लिंबाचा वृक्ष आजही उभा असून, त्याचा पाला कडू नव्हे तर चक्क गोड लागतो!’ अशी आश्चर्यकारक माहिती त्यांनी दिली. धूपखेडा गावातील चाँद पटेल यांच्या घरी लग्न होते. त्याकाळी बैलगाड्यांद्वारे धूपखेड्याचे वऱ्हाड शिर्डीला रवाना झाले. या वऱ्हाडासोबतच किशोरवयीन साईबाबासुद्धा शिर्डीला पोहोचले व तेथेच स्थायिक झाले. साईबाबांचे संतकार्य व कर्मभूमी ही शिर्डीच आहे. तथापि ते येथूनच शिर्डीला गेले. विशेष म्हणजे ज्या चाँद पटेल यांच्या वऱ्हाडासोबत बाबा शिर्डीला गेले त्या चाँद पटेलचे वंशज आजही धूपखेडा येथेच वास्तव्याला आहेत. मात्र ही प्रकटभूमी विकासापासून वंचित आहे.

या पार्श्वभूमीवर धूपखेडा क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाने 100 कोटी रुपयांची तरतूद करावी, अशा मागणीचा ठराव ग्रामस्थांनी घेतला असून, रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला आहे.

साई सच्चरित्रात धूपखेड्याचा उल्लेख
सध्या धूपखेडा गावात साईबाबा मंदिर असून, तेथे दररोज धार्मिक विधी केले जातात. गुरुवारी तर या मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. साईबाबांच्या सच्चरित्राच्या पाचव्या आवृत्तीत पैठण तालुक्यातील धूपखेड्याचा उल्लेख आहे. शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानच्या वतीने हे साईचरित्र प्रकाशित करण्यात आलेले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या