लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचे होते! वाचा, दबंग-3 ची अभिनेत्री सई मांजरेकरची सविस्तर मुलाखत

822
salman-sai-manjrekar-1

<<मंगेश दराडे>>

सलमान खानचा ‘दबंग 3’ सिनेमा सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई या सिनेमातून अभिनयाचा श्रीगणेशा करतेय. माझ्यातील साधेपणामुळे ‘खुशी’ ही भूमिका मला ऑफर झाली. भविष्यात पठडीबाहेरच्या भूमिका साकारण्याची आणि त्यासाठी जीवतोड मेहनत घेण्याची आपली तयारी असल्याचे सई सांगते.

‘दबंग 3’ची ऑफर कशी मिळाली?
गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात मला सलमान सरांचा फोन आला होता. ‘दबंग 3’साठी आम्ही तुझा विचार करतोय असे त्यांनी मला सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून मी लूक टेस्ट आणि क्रीन टेस्ट दिल्या आणि खुशी या भूमिकेसाठी माझी निवड झाली. खुशी ही गावची तरुणी आहे. ती खूप साधीभोळी आहे. माझ्यातला साधेपणा सलमान सरांना भावला त्यामुळेच ही भूमिका मला मिळाली.

या भूमिकेसाठी काय तयारी केलीस?
सर्वात आधी मला वजन कमी करावे लागले. साधारण 10 ते 11 किलो वजन मी कमी केले. मी मुळात शहरात वाढलेली आहे. गावच्या तरुणीची भूमिका साकारण्यासाठी तिथल्या तरुणींचे हावभाव, त्यांचे राहणीमान आणि ग्रामीण भाषा मला आत्मसात करावी लागली.

सलमानसोबत कामाचा अनुभव कसा होता?
खूपच छान. त्यांच्यासारख्या अनुभवी कलाकाराकडून मला खूप काही शिकायला मिळाले. ते खूप मेहनती आहेत. आणि इतका मोठे सुपरस्टार असूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना दडपण आले नाही.

सेटवरचा पहिला दिवस कसा होता?
पहिल्या दिवशी मी जरा घाबरले होते. चुलबुल आणि खुशी यांच्या भेटीचा प्रसंग आम्हाला चित्रित करायचा होता. मला जमेल की नाही याची मनात धाकधूक होती, पण प्रभू सरांनी ऍक्शन म्हणताच मी त्या भूमिकेशी समरस झाले आणि पहिल्याच टेकमध्ये हा सीन ओके झाला.

लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचे होते का?
होय, मुळात घरातच फिल्मी वातावरण होते त्यामुळे लहानपणापासूनच या क्षेत्राकडे माझा ओढा होता. दुसऱया कोणत्याही क्षेत्राचा मी विचारदेखील केला नव्हता. बारावी पूर्ण झाल्यावर मलादेखील या क्षेत्रात यायचे आहे असे गेल्याच वर्षी मार्च महिन्यात मी आईबाबांना सांगितले होते. योगायोगाने एप्रिल महिन्यातच मला ‘दबंग 3’ सिनेमाची ऑफर आली.

रीलीजआधीच चाहत्यांचे खूप प्रेम तुला मिळतेय. त्याबद्दल काय सांगशील?
खूप बरं वाटतंय. चाहत्यांच्या प्रेमाविना कोणताही कलाकार अधुरा असतो. असेच प्रेम पुढेदेखील प्रेक्षक या सिनेमावर आणि माझ्यावर करतील अशी मला खात्री आहे.

कोणत्या भूमिका साकारायला आवडतील?
भूमिकांबाबत मी विचार केला नाही, पण मला कोणत्याही चौकटीत अडकायचे नाही. पठडीबाहेरच्या भूमिका साकारण्याची आणि त्यासाठी जीवतोड मेहनतीची तयारी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या