
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीच्या वतीने गुरुवारी ( 26 डिसेंबर) कंकणाकृती सुर्यग्रहण असल्यामुळे श्री साईबाबा समाधी मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सकाळी 8.00 ते सकाळी 11.00 यावेळेत दर्शनासाठी समाधीमंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
26 डिसेंबरला सकाळी 8.05 ते सकाळी 11.00 या काळात कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे. त्यामुळे श्री साईबाबा समाधी मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये बदल करण्याबाबतचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला आहे. यामध्ये सकाळी 8.00 वाजता श्रींचे दर्शन बंद होईल. सकाळी 8.05 वाजता समाधी मंदिरात मंत्रोपचार सुरु होईल. सकाळी 11.00 वाजता मंत्रोपचार संपल्यानंतर श्रींचे मंगलस्नान होऊन श्रींची आरती होईल. दुपारी 12.30 वाजता श्रींची माध्यान्ह आरती होईल. तसेच ग्रहण काळात श्री साईसत्यव्रत व अभिषेक पुजा बंद ठेवण्यात आल्यामुळे त्याकाळातील ऑनलाईन बुकींग केलेल्या साईभक्तांकरीता सकाळी 7.00 ते 8.00 यावेळेत श्री साईसत्यव्रत व अभिषेक पुजेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगून सर्व साईभक्तांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मुगळीकर यांनी केले आहे.




























































