साईबाबांचे दर्शन होणार सुकर, सुरक्षित; साईबाबा संस्थानने उभारली वातानुकुलित तीनमजली दर्शनरांग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिर्डीत येणाऱया देश-विदेशातील भाविकांना सुकर आणि सुरक्षित दर्शन घेता यावे, यासाठी साईबाबा संस्थानने 109 कोटी रुपये खर्चून वातानुकूलित तीन मजली दर्शनरांग प्रकल्प तयार केला आहे. त्यामुळे भाविकांना आता सावलीमध्ये थांबून रांगेमध्ये दर्शन घेणे सोयीचे होणार आहे.

शिर्डी साईबाबा देवस्थानच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवले जातात. साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून भाविक मोठय़ा प्रमाणावर येत असतात. गत काही वर्षांत अद्ययावत बसस्थानक, रेल्वेसेवा, विमानसेवा सुरू झाल्याने भाविकांच्या संख्येत आणखीनच भर पडली आहे. दोन दिवसांपूर्वीच वंदे भारत रेल्वे आणि शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर नाईट लँडिंगचा परवाना मिळाला आहे. शिवाय रामनवमी, विजयादशमीचा उत्सव तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी लाखो साईभक्त शिर्डीत येत असतात.

पूर्वी मंदिराच्या बाहेरून दर्शनरांग सुरू होऊन मंदिर परिसरातून मंदिरात जाता येत होते. मात्र, साईबाबा संस्थानच्या वतीने दर्शनरांगेसाठी स्वतंत्र तीनमजली वातानुकुलित इमारत उभारण्यात आली आहे. या दर्शनरांगेचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. या रांगेच्या माध्यमातून दिवसभरात एक लाख भाविकांना दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय 14 एकरांवर 218 कोटींचा पाचमजली शैक्षणिक प्रकल्पही उभारण्यात आला आहे. 19 ऑक्टोबर 2018 रोजी या दोन्ही प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले. त्यानंतर चार वर्षांत दोन्ही प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत.

संस्थानच्या माध्यमातून 327 कोटी खर्चून उभारण्यात येत असलेला दर्शनरांग प्रकल्प आणि उच्चतम दर्जाच्या शैक्षणिक संकुलाचे काम पूर्णत्वास गेले आहे. लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

– राहुल जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान, शिर्डी.

दर्शनरांग प्रकल्प दृष्टिक्षेपात

 बांधकाम क्षेत्रफळ 2 लाख 61 हजार 920 चौरस फूट, घडीव दगडाची वातानुकूलित दर्शनरांग, प्रवेशासाठी 3 भव्य प्रवेशद्वार, एकाच वेळी सुमारे 45 हजार भाविकांना मौल्यवान वस्तू, मोबाइल, चप्पल ठेवण्यासाठी लॉकर्स, बायोमेट्रिक पास काउंटर 48, लाडू प्रसाद काउंटर 20, देणगी काउंटर 10, चहा, कॉफी काउंटर व बॅग स्कॅनर 6, सिक्युरिटी चेकअप सेंटर 25, सिक्युरिटी चेक काउंटर्स 25, पहिल्या व दुसऱया मजल्यावर 10 हजार भाविकांच्या क्षमतेचे 12 वातानुकूलित हॉल, पिण्याचे पाणी, प्रथमोपचार केंद्र.

राजस्थानमधून ग्रॅनाईट

दर्शनरांगेसाठी राजस्थानातून ग्रॅनाईट आणले असून, भिंतीसाठी काळ्या पाषाणी दगड लोणावळा, नांदेड, नेवाशाचा आहे. 10 हजार चौरस फुटांच्या बांधकामासाठी तब्बल 1 लाखाच्यावर दगड घडवण्यात आले. दोन वर्षांत बिहार, बंगालमधील 50 कारागिरांनी ही वास्तू घडवली आहे.

शैक्षणिक कॉम्प्लेक्स

इंग्लिश मीडियम स्कूल, मुलींसाठी शाळा, ज्युनियर व सीनियर कॉलेज, आयटीआय आदींसाठी स्वतंत्र इमारती, प्रयोगशाळा, आर्ट हॉल, वाचनालय, भोजनकक्ष, 1050 क्षमतेचे एसी ऑडिटोरियम, क्रीडा संकुल, जलतरण तलाव, स्वतंत्र स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये स्वतंत्र जिम, बॅडमिंटन हॉल, टेबल टेनिस कक्ष.