येवल्यात झेलमसह साईनगर एक्स्प्रेसला मिळणार थांबा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, येवला

येथील रेल्वे स्थानकावर पुणे जम्मूतावी झेलम एक्स्प्रेस तसेच साईनगर शिर्डी दादर एक्स्प्रेसला थांबा देण्यासाठी सोलापुर रेल्वे मंडळाने अनुकूलता दर्शविली आहे.या संदर्भात सोलापूर विभागाचे महाप्रबंधक हितेंद्र मल्होत्रा यांनी मध्य रेल्वेचे विभागीय सल्लागार समितीचे येथील सदस्य आनद शिंदे यांना आश्वासन दिले आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय सल्लागार मंडळाची बैठक सोलापूर येथे नुकतीच पार पडली. या वेळी खासदार हरिचंद्र चव्हाण यांचे प्रतिनिधी नवनियुक्त सदस्य व येथील भाजपचे शहराध्यक्ष आनंद शिंदे यांनी रेल्वे स्थानकाच्या विविध प्रश्नांकडे महाप्रबंधकाचे लक्ष वेधले. मल्होत्रासह वाणिज्य प्रबंधक आर.के.शर्मा,अप्पर मंडल प्रबंधक व्हि.के.नागर यांची प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीला दौंड,उस्मानाबाद,नगर,लातूर,पंढरपूर,येवला आदी भागातील सल्लागार समिती सदस्य उपस्थित होते.शिर्डी येथे भारतभरातून साईभक्त दर्शनासाठी येत असल्याने या ठिकाणी येणार्या यात्रेकरूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीकडे शिंदे यांनी लक्ष वेधले. तसेच 1953 पासूनचे असलेले येवला स्थानक असूनही याचा विकास झालेला नसल्याने पैठणीचे गाव असूनही रेल्वे स्थानकाकडे दुर्लक्ष होत आल्याची खंत बैठकीत बोलताना त्यांनी व्यक्त केली.

येथील रेल्वे स्थानकावर तीन पॅसेंजर व फक्त एकच एक्स्प्रेसला थांबा देण्यात आलेला आहे. परिणामी येथील व्यापाऱ्यांसह प्रवासी मनमाड व कोपरगाव येथे जाऊन तिकीट बुकिंगसह चढ उतार करतात. सेनापती तात्या टोपे यांची जन्मभूमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची धर्मांतराच्या घोषणा,काद्यांची व पैठणीची मोठी बाजारपेठ येथे असून रोज हजारो प्रवासी येथून पुना, मुंबईच्या दिशेने ये-जा करतात.मात्र प्रवाशांना कोपरगाव व मनमाडला जाण्यासाठी अतिरिक्त वेळ पैसा खर्च करण्यासह रात्री अपरात्री घरातून निघन्याची वेळ येत आहे. प्रवाशांची गैरसोय व मोठी बाजारपेठ असल्याने येथील स्थानकावर झेलम व दादर एक्स्प्रेसला थांबा देण्यासह दुसऱ्या बाजूने प्लॅटफॉर्म करावा, पादचारी पूल निर्माण करावा, प्रवाशांना पाण्याची व शौचालय सुविधा उपलब्ध करावी आदि मागण्या शिंदे यांनी या बैठकीत केल्या.