
वारकरी संप्रदायाने भेदाभेद, लिंगभेद विसरून समाजात समता, ममता, बंधुता निर्माण केली. त्याच समतेच्या दृष्टीने संत भागुबाई यांना संतमंडळीत स्थान आहे. पंढरपुरातील रस्त्यांची स्वच्छता करणाऱ्या या स्री संत कवयित्रीचे काही मोजकेच अभंग उपलब्ध आहेत. बाकी त्यांच्या चरित्राचे काही संदर्भ मिळत नाहीत. त्या काळात सर्वांनाच देवाच्या गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नसे. संत भागुबाईंना मंदिरात जाण्याची अपार ओढ होती. त्यांनी आपल्या मनातील हे दुःख मोठय़ा करुणेने व्यक्त केले आहे.
पांडुरंगावरील निष्ठा आणि मनात होणारी तगमग त्यांच्या अभंगातून प्रकट होते. त्यांच्या एका अभंगातून त्यांच्या वाटय़ाला आलेलं उपेक्षिताचं जगणं स्पष्ट होते. त्या अभंगात म्हणतात, रस्त्याची झाडलोट करणारी मी मला इतर भक्तांप्रमाणे देवाचे दर्शन घेता येत नाही. मग त्या विठ्ठलालाच विनवणी करतात, आम्ही तुझ्या दर्शनाच्या अपेक्षेने आलो आहोत. देवा आता तूच आम्हाला येऊन भेट. तो अभंग म्हणजे,
आलो तुझ्या दर्शनासीं । भेट द्यावी बा आम्हांसी ।। सर्व संत हो राऊळीं । मी रे एकली तळमळी ।।






























































