
सामना ऑनलाईन । वाराणसी
भाजप आणि त्यांचे मोदी सरकार राम मंदिराच्या उभारणीच्या बाजूने मुळीच नाही, असा घणाघात करतानाच अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्रगिरी यांनी ‘कुंभमेळा संपताच तमाम साधू-संत अयोध्येकडे कूच करतील आणि राममंदिराचे बांधकाम सुरू करतील’, अशी घोषणा आज केली.
राममंदिराच्या उभारणीला होत असलेला विलंब आणि त्याच्या मार्गातील अडसर पाहता साधू-संतांना अयोध्येत दाखल होण्यावाचून आता पर्यायच उरलेला नाही, असे त्यांनी सांगितले. अयोध्येतील रामजन्मभूमीच्या वादावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी गेल्या गुरुवारीच 29 जानेवारीपर्यंत लांबणीवर पडली आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठातील न्यायमूर्ती यु. यु. ललित यांनी त्या सुनावणीतून अंग काढून घेतले. त्यामुळे आता नव्या घटनापीठासमोर पुढील सुनावणी होणार आहे.
यावेळच्या धर्मसंसदेमध्ये राममंदिराच्या उभारणीसाठी काही तरी मार्ग निश्चितच शोधून काढला जाईल, असे महंत नरेंद्रगिरी यांनी अलीकडेच जाहीर केले होते. अखेर त्यांनी कुंभमेळय़ानंतर साधू-संतांसहित अयोध्येत धडकण्याची घोषणा आज करून टाकली. ‘धर्मसंसद’ तर दरवर्षी होते. पण राममंदिरासाठी त्यात ठोस निर्णय काही होत नाही. त्यामुळे अखिल भारतीय आखाडय़ाच्या बैठकीनंतर अयोध्येकडे कूच केली जाईल, असे त्यांनी आधी म्हटले होते.
भाजपला राममंदिराची उभारणी करण्यात मुळीच रस नाही. त्यांना हा प्रश्न केवळ लोकसभा निवडणुकीसाठीच तापवायचा आहे.
– महंत नरेंद्रगिरी, अध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद
























































