लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा! आतषबाजीने सज्जनगडचा उजळला आसमंत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’, अशा गगनभेदी जयघोषात तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आज पहाटे शेकडो मशालींनी किल्ले सज्जनगड उजळून निघाला. यावर्षीचा चौथा ‘मशाल महोत्सव’ दिमाखात साजरा करण्यात आला.

यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेची बसस्थानक ते सज्जनगड अशी पालखीतून मिरवणूक, शिंग, तुतारी, हलगी वाद्य शेकडो मशाली मर्दानी आगीचे चित्तथरारक खेळ व छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, समर्थ रामदास स्वामींच्या जयघोषाने परिसर दुमदुमला होता. यावेळी शेकडो धगधगत्या मशालींनी सज्जनगड तेजोमय झाल्याचेच चित्र होते.

रविवारी पहाटे साडेतीन वाजता किल्ले सज्जनगड मशाल महोत्सवास सुरुवात झाली. सातारा जिह्यासह राज्यातून शेकडो शिवसमर्थ भक्त गडावर दाखल झाले होते. ‘आपला सज्जनगड आपलीच जबाबदारी’, ‘एक दिवा शिव समर्थ चरणी’ या उपक्रमांतर्गत किल्ले सज्जनगड संवर्धन समूह, दुर्गनाद प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. पहाटे भव्य मिरवणुकीने सोहळय़ास प्रारंभ झाला. सुरुवातीस हलगी वादक यानंतर पारंपरिक पोशाखामध्ये शिंग तुतारी वादक, त्यापाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची फुलांनी चांदीच्या मखरांनी सजवलेली पालखी, यानंतर शेकडो युवक, युवती मशाल घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करीत किल्ले सज्जनगडावर येत होते.

सज्जनगडावर पालखी दाखल होताच, समर्थ सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश व रामदासी यांच्या हस्ते पालखीचे स्वागत करण्यात आले. यानंतर पालखी मिरवणूक अंगलाई देवी मंदिर येथे प्रदक्षिणा घालत धाब्याच्या मारुतीकडे दाखल झाली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. हा भव्य दिव्य सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक गडावर आले होते. आगीचे साहसी खेळ, मर्दानी खेळ, फटाक्यांच्या आतषबाजीने शिवसमर्थ भक्तांची दिवाळी पहाट शिवमय झाली. मर्दानी खेळ झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृतीसमोर खडय़ा आवाजात ध्येयमंत्र म्हणण्यात आला.

तटबंदीला फुलांची सजावट

‘मशाल महोत्सवा’चे चौथे वर्ष मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आले. यावेळी गडाच्या तटबंदीला फुलांची सजावट करण्यात आली होती. ही फुलांची सजावट तसेच उभारण्यात आलेले महाराजांचे मोठे फ्लेक्स सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. फुलांच्या सजावटीमुळे तटबंदीला गतवैभव मिळाल्याचे चित्र दिसत होते.