
साकीनाका खैरानी रोड येथील आशापुरा कंपाऊंडला गुरुवारी सायंकाळी लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा मृत्यू झाल्याचे आज समोर आले. या आगीत सुमारे 35 गाळे-गोदामे जळून खाक झाली. या आगीत शुक्रवारी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगितले जात होते, मात्र शोधमोहीम सुरू असताना रात्री उशिरा दोघांचे मृतदेह आढळले.
साकीनाका खैरानी मार्गाकरील इंडस्ट्रीज एरियातील दोन रासायनिक गाळ्यांना शुक्रवारी सायंकाळी 5.45 वाजण्याच्या सुमारास आग लागली. दरम्यान, रात्री सवाअकरा वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. यानंतर कुलिंग ऑपरेशन आणि शोधमोहीम सुरू होती. यावेळी रात्री उशिरा आरती लालजी जैस्वाल (25) आणि पीयूष पिथाडिया (42) यांचा मृतदेह आढळला.
आगप्रकरणी तिघांना अटक
साकीनाका येथे लागलेल्या आगीप्रकरणी पोलिसांनी केलेल्या चौकशीत काहीजणांनी ज्वलनशील पदार्थांच्या बेकायदेशीरपणे केलेल्या साठय़ाला आग लागून भडका उडाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मथुरादास भद्रा (45), उदयालाल गौरी, खेमशिंघ राजपूत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे तर प्रताप गोरी (38) हा फरार आहे.




























































