
शेअर मार्केटचा हवाला देत बार्शी शहरातील नागरिकांना एका ठगाने कोटय़वधी रुपयांचा गंडा घातला आहे. त्यात 5 कोटी 63 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले असून, याप्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सोलापूरचे अपर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव यांनी दिली आहे. बार्शी शहरातील उच्चशिक्षित गुंतवणूकदारांना अलका शेअर्स सर्व्हिसेस या कंपनीच्या माध्यमातून तीन महिन्यांत दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे. अनेकांनी गुंतवणूक केली असल्याने ही रक्कम 200 कोटींपेक्षा पुढे असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विशाल अंबादास फटे, त्याची पत्नी राधिका फटे, वडील अंबादास गणपती फटे, भाऊ वैभव आणि आई अलका अंबादास फटे (सर्व रा. उपळाई रोड, बार्शी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दीपक बाबासाहेब अंबारे (रा. शेळगे प्लॉट, बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे.
बार्शीतील अलिपूर रोडवर राहणारा फटे याने गेल्या 2 वर्षांपासून शेअर मार्केटिंगची कंपनी सुरू केली आहे. या कंपनीमार्फत गुंतवणूक करणाऱ्यांना अवघ्या तीन महिन्यांत पैसे दामदुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून कोटय़वधी रुपयांची माया जमविली आहे. यात राजकीय, शासकीय अधिकारी, डॉक्टर्स, व्यापारी क्षेत्रातील बडय़ांनी मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. सुरुवातीला गुंतवणूकदारांना रकमा परत करून आकर्षित केले. या बडय़ा मंडळींबरोबरच सर्वसामान्यांनीही गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्याने गुंतवणुकीची रक्कम 200 कोटींपेक्षा पुढे आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरातील कार्यालय बंद असून, फटे बाहेरही आला नव्हता. त्यामुळे गुंतवणूकदारांत बेचैनी होती. दरम्यान, तो गुरुवारी कुटुंबीयांसह गायब झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. फटे कुटुंबीयाकडे पासपोर्ट असल्याची माहिती मिळाली असून, तो परदेशात पळाल्याची चर्चा सुरू आहे.
या फसवणूकप्रकरणी दीपक अंबाटे यांनी बार्शी पोलीस ठाण्यात शेअर ब्रोकर विशाल फटेविरुद्ध पाच कोटी 73 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी पत्नी राधिका, वडील अंबादास, भाऊ वैभव व आई अलका यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. विशाल फटे याचे पूर्वी नेटकॅफे होते. येथेच दीपक अंबाटे यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय असून, त्यांनी वेळोवेळी गुंतवणूक केली. मात्र, गुंतवणुकीचा कुठलाही व्यवहार फटे याने समोर आणला नाही. फटे याच्यावरील विश्वासामुळे अंबोटचे मित्र व नातेवाईकांनीही त्याच्याकडे गुंतवणूक केली आहे. अमोल अर्जुन काळे, सुभाष चंद्रकांत घोगरे, किरण बाबासाहेब अंबाटे, संग्राम दिलीप मोहिते, सूर्यकांत व्हनकळस, हनुमंत सुभाष ननवरे यांच्यासह नातेवाईकांनी फटेकडे 5 कोटी 63 लाख 25 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. याकरिता त्याने बनावट बँकखातेही उघडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फसवणूकप्रकरणी विशाल फटेसह त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
बार्शी पोलीस ठाण्यासमोर गुंतवणूकदारांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी नागरिकांची फसवणूक झाली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आता संबंधित कंपनी सील करण्यात आली आहे. या फसवणुकीची व्याप्ती, त्यांचे एजंट्स, गुंतवणूकदारांची संख्या यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती सोलापूरचे अपर अधीक्षक हिंमतराव जाधव यांनी दिली.





























































