दोन महिन्यांच्या बाळाला वाचवणाऱया जिगरबाज साक्षीला नवा पाय बसवणार; शिवसेनेकडून मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलादपूरच्या केवनाळे येथे झालेल्या दुर्घटनेत स्वतःचा जीव धोक्यात घालून दोन महिन्यांच्या बाळाला वाचवणाऱया साक्षी दाभेकर हिला नवा पाय बसवला जाणार आहे. या दुर्घटनेत 14 वर्षांच्या साक्षीच्या पायावर भिंत कोसळल्याने तिचा एक पाय निकामी झाला आहे. साक्षीवर सध्या पालिकेच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  महापौर किशोरी पेडणेकर यांनी साक्षीची भेट घेऊन धीर दिला. यावेळी महापौर पेडणेकर आणि आरोग्य समिती अध्यक्षा राजुल पटेल यांनी रोख एक लाख तर नगरसेवक अनिल कोकीळ यांनी 25 हजार रुपयांचा धनादेश साक्षीकडे सुपूर्द केला.

पोलादपूर तालुक्यातल्या अतिदुर्गम डोंगरात वसलेल्या केवनाळे गावात शेजारच्या मुक्या महिलेच्या दोन महिन्यांच्या बाळाला वाचवताना 14 वर्षांच्या साक्षी दाभेकरच्या पायावर घराची अर्धी भिंत कोसळून एक पाय निकामी झाला होता. साक्षीने जीव धोक्यात घालून दाखवलेल्या धाडसाबद्दल महापौर किशोरी पेडणेकर यांनी केईएम रुग्णालयात जाऊन भेट घेऊन आस्थेने विचारपूस केली. शिवाय आर्थिक मदतही करण्यात आली. याप्रसंगी केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख व संबंधित डॉक्टर उपस्थित होते.

अशी घडली दुर्घटना

साक्षी दाभेकर ही क्रीडा क्षेत्राची आवड असणारी आणि नैपुण्य असणारी नववीत शिकणारी 14 वर्षांची मुलगी आहे. अतिवृष्टीत गेणू दाभेकर आणि त्यांच्या शेजारच्या चार घरांवर एक दरड कोसळली. शेजारच्या घरातल्या नवजात बालकाचा टाहो ऐकला आणि साक्षीने एका उडीतच तिने शेजारच्या उफाळे कुटुंबातील बाळाचा जीव वाचवला. तिने एका लहान बाळावर आलेले संकट स्वतःवर झेलले. मात्र या दुर्घटनेत अर्धी भिंत कोसळून तिच्या पायावर पडल्याने पाय निकामी झाला.

जर्मनीच्या ऑटोबोक कंपनीचे रबर पाय मोफत बसवणार

यावेळी बोलताना महापौर किशोरी पेडणेकर साक्षीला धीर देताना म्हणाल्या की, ज्याप्रमाणे हिमतीने तू बाळाला वाचवले आहेस तीच हिंमत आताही कायम ठेव. तुझ्यावर केईएम रुग्णालय संपूर्णपणे मोफत उपचार करणार असून प्रारंभी जयपूर फूट व त्यानंतर बारा लाख रुपये खर्च करून जर्मनीच्या ऑटोबोक कंपनीचे सारबो रबर पाय मोफत बसविण्यात येणार आहेत.  तू पूर्वीप्रमाणेच धावण्याच्या शर्यतीत सहभागी होऊ शकणार, असा तिला धीर दिला!