
राज्याच्या तिजोरीत सध्या खडखडाट झाल्यामुळे सरकारी कंत्राटदारांचे पैसे थकले आहेत. सरकारने योजनांच्या खर्चांवर मर्यादा घातल्या आहेत. घोषणा केलेल्या लोकप्रिय योजना बंद होण्यास सुरवात झाली आहे. त्यापाठोपाठ आता सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार मिळण्यास विलंब होण्यास सुरुवात झाली आहे. निम्मा नोव्हेंबर महिना संपला तरी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील वेगवेगळ्या विभागांतील कर्मचाऱ्यांचा पगार आजच्या तारखेपर्यंत झालेला नाही. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे
लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर सध्या प्रचंड भार वाढला आहे. पण तरीही सरकारी कर्मचाऱ्यांचे दर महिन्याचे वेतन वेळेवर दिले जात होते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दरवर्षी सुमारे अडीच लाख कोटी रुपये खर्च होतो असा प्राथमिक अंदाज आहे. पण तरीही सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होत आहे. पण यंदा प्रथमच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (सार्वजनिक उपक्रम वगळून) कर्मचाऱ्यांच्या पगाराला विलंब झाल्याची माहिती पुढे आली आहे. याचा सर्वात मोठा फटका नाशिक विभागातील कर्मचाऱ्यांना सर्वप्रथम बसला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या विभागातून पदांचा ताळमेळ पुढे न पाठवल्याने पगार निघालेले नाहीत असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
घरांचे हप्ते थकले
दर महिन्याच्या पगाराच्या रकमेवर घरखर्चापासून मुलांच्या शाळेच्या कॉलेजच्या फी घराच्या कर्जाचे हप्ते ठरलेले असतात. आज महिना संपत आला तरी पगार झाले नाहीत. त्यामुळे घराचे हप्ते रखडले आहेत. बँकांमधून दर महिन्याच्या हप्त्यासाठी तगादा सुरू झाल्याचे सरकारी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र वित्त विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभागातील एकही अधिकारी यावर भाष्य करण्यास तयार नाही.
पदांचा ताळमेळ म्हणजे काय…
पदांचा ताळमेळ म्हणजे सब डिव्हिजनमधून एखाद्या विभागातील पदांची संख्या डिव्हिजनमध्ये जाते. मग पुढे रिजनल ऑफीसमधून मंत्रालयात जाते. मग मंत्रालयातून ट्रेजरीमध्ये पदांची यादी जाते आणि मग कर्मचाऱ्यांचा पगार निघतो. पण सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे पदांचा ताळमेळ पाठवण्यात आलेला नाही. त्यामुळे पगार निघालेला नाही.































































