
रिझर्व्ह बँकेने बँकांशी निगडीत काही नियम बदलण्याचं ठरवलं आहे. हे बदल 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होणार आहेत. रिझर्व्ह बँकेने नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊसच्या (National Automated Clearing House- NACH) नियमांत बदल केले आहेत. या बदलामुळे NACH ची सेवा आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध राहील.
NACH ची सेवा आठवड्यातील सातही दिवस उपलब्ध असण्याचा फायदा हा खासकरून पगारदार वर्गाला आणि निवृत्ती वेतन असणाऱ्या लोकांना होणार आहे. ही सेवा सातही दिवस सुरू राहिल्याने पगार आता रविवारी आणि सुट्टीच्या दिवशीही बँक खात्यात जमा होऊ शकेल. कर्जाचा हफ्ता हा देखील कोणत्याही दिवशी भरता येऊ शकेल. पूर्वी रविवारी किंवा सुट्टी आल्यास हे व्यवहार करण्यासाठी बँकेचा कामकाजी दिवस उजाडण्याची वाट पाहावी लागत होती. NACH ची सेवा पगार, निवृत्ती वेतन, व्याज, डिव्हीडंट यासारख्या मोठ्या व्यवहारांसाठी वापरली जाते.
1 ऑगस्टपासून एटीएममधून पैसे काढण्यासंदर्भातील नियमांतही बदल होणार आहे. ग्राहक आपल्या बँकेच्या एटीएममधून महिन्याला 5 व्यवहार निशुल्क करू शकेल. त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी ग्राहकाला पैसे मोजावे लागतील. हे शुल्क 15 ते 17 रुपयांपर्यंत असेल. आयसीआयसीआय बँकेनेही ग्राहकांसाठी पैसे काढण्याच्या नियमांत काही बदल केले आहेत. ग्राहकांसाठी 4 व्यवहार हे निशुल्क असतील. त्यानंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी शुल्क भरावं लागेल जे 150 रुपये असेल. म्हणजेच एका महिन्यात तुम्ही पाचव्यांदा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा खात्यातून पैसे काढलेत तर त्यासाठी आयसीआयसीआय बँक तुमच्याकडून शुल्क वसूल करेल. त्याचप्रमाणे ग्राहक दिवसाला होम ब्रँचमधून महिन्याला 1 लाख रुपयापर्यंत पैसे काढता येतील. त्यानंतरच्या व्यवहारसाठी ग्राहकाला हजार रुपयांमागे 5 रुपये शुल्क द्यावं लागेल. झी बिझनेसच्या संकेतस्थळावर याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.




























































