एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमध्ये वेतन घोटाळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

सामना ऑनलाईन,नवी मुंबई

एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमध्ये माथाडी कामगारांच्या एका टोळीमध्ये 92 कामगार असले तरी काम फक्त 50 कामगारच करीत असले तरी पगार मात्र सर्वच कामगारांचा काढला जात आहे. हा प्रकार उघडकीस येऊन जवळपास आठ महिने लोटल्यानंतरही माथाडी मंडळाने काम न करता पगार घेणाऱ्या या कामगारांवर कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे हा माथाडी घोटाळा प्रशासनाच्या मर्जीने सुरू असल्याचे उघड झाल्याने माथाडी कामगारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

भाजीपाला मार्केटच्या ओपन शेडमध्ये माथाडी कामगारांची 157 क्रमांकाची टोळी कार्यरत आहे. या टोळीच्या रेकॉर्डवर 92 कामगार असले तरी प्रत्यक्षात या ठिकाणी फक्त 50 किंवा 55 कामगार दररोज मालाची चढ-उतार करण्याचे काम करतात. काम जरी निम्मे कामगार करीत असले तरी पगार मात्र टोळीच्या रेकॉर्डवर असलेल्या सर्वच कामगारांचा काढला जात आहे. त्यामुळे काबाडकष्ट करूनही या कामगारांच्या वाटय़ाला कमी पगार येत आहे. याच टोळीत काम करणारे माथाडी कामगार अनिल पवार यांनी हा प्रकार आठ महिन्यांपूर्वी उघडकीस आणला. त्यानंतर त्यांनी काम न करता पगार घेणाऱया या कामगारांवार कारवाईची मागणी वारंवार केली. मात्र माथाडी मंडळाने त्याची कोणतीही दखल घेतली नाही.

फक्त चर्चा आणि बैठका
काम न करता पगार घेणाऱ्या या टोळीतील कामगारांवर माथाडी नेत्यांचा वरदहस्त आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. माथाडी मंडळाचे सचिव हरेश पुरी यांनी फक्त चर्चा आणि बैठकांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे या टोळीत काम करणाऱ्या अन्य कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे.