बिग बॉसनंतर आता सलमान खान राधेच्या शूटींगला करणार सुरुवात

सलमान खानचा बहुप्रतिक्षित ‘राधे’ या सिनेमाच्या शूटींगला 2 ऑक्टोबरपासून कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये पुन्हा सुरूवात होणार आहे. शूटींगच्या या शेड्यूलमध्ये 15 दिवस शूटींग करण्यात येणार आहे. या 15 दिवसांच्या चित्रिकरणानंतर पॅचवर्कसाठी वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये अंतिम चित्रीकरण पार पडेल. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्याबरोबरच टीम कलाकार आणि क्रू मेम्बर्सच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त खबरदारी देखील घेतली जाणार आहे. कर्मचाऱ्यांचा प्रवास टाळण्यासाठी प्रॉडक्शन टीमने स्टुडिओ जवळील हॉटेलमध्ये सर्व कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे.

शूटींग सुरू असताना कोणत्याही कर्मचाऱ्याला बाहेरील व्यक्तीला भेटण्याची परवानगी असणार नाही. प्रोडक्शनच्या जवळील सूत्रांनी सांगितले की, “संपूर्ण क्रू ची कोविड टेस्ट करण्यात आली असून कोणाचेही रिजल्ट पॉजिटिव आलेले नाहीत. एका विशेष व्हिडीओच्या माध्यमातून सेटवर पाळण्यात येणाऱ्या खबरदाऱ्यांबाबत सगळ्यांना माहिती देण्यात येणार आहे. सलमान खान सेटवर पूर्ण सावधगिरी बाळगण्याबाबत आग्रही आहे. त्याच्या सल्ल्यानुसार, सेटवर एक डॉक्टर आणि एक विशेष टीम असणार आहे.

“आम्हाला आनंद आहे की राधेचे चित्रीकरण पुन्हा सुरू होत आहे. आम्ही दररोजच्या वापरातील वस्तूंचे सॅनिटायझेशन नियमित होईल याची खबरदारी घेतली आहे”, असे अतुल अग्निहोत्री यांनी सांगितले. या चित्रपटात सलमान आणि दिशा पटानी व्यतिरिक्त रणदीप हुड्डा खलनायकाच्या भूमिकेत असून जॅकी श्रॉफ एक खास व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या