
समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य हे आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. आता त्यांनी आणखी एक विधान करून वाद ओढवून घेतला आहे. या विधानाचा व्हिडीओही व्हायरल झाला असून नेटकरी त्यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
उत्तर प्रदेश इथल्या मऊ जिल्ह्यात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात स्वामी प्रसाद मौर्य यांनी एक विधान करून वाद ओढवून घेतला आहे. भाजप नेत्यांवर टीका करताना मौर्य म्हणाले की, तूप रोट्या खाऊन खाऊन यांच्या शरीरात इतकी चरबी जमा झाली आहे की त्यांची हाडंच दिसत नाहीत. स्वामी प्रसाद मौर्यने सहा वेळा कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे. तीन वेळा विरोधी पक्षात असून कॅबिनेटचा दर्जा होता. आता मी माझे कपडे उतरवले तरी तुम्ही माझं हाड न हाड मोजू शकाल, असं विधान करून मौर्य यांनी वाद ओढवून घेतला आहे.
या विधानाचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी मौर्य यांनी रामचरितमानसवर वक्तव्य केल्यानंतर त्यांचं मानसिक संतुलन ढासळल्याचं म्हटलं आहे. जानेवारी महिन्यात स्वामी प्रसाद मौर्य यांनी रामचरितमानस या ग्रंथाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. अनेक लोक रामचरितमानस वाचत नाहीत. ते तुलसीदास यांनी स्वतःच्या आनंदासाठी लिहिलं होतं. त्यामुळे सरकारने त्यातला आक्षेपार्ह भाग वगळावा किंवा पुस्तकावरच बंदी आणावी, असं विधान मौर्य यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर वाद सुरू झाला होता.




























































