संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये हल्ला; जमावाने घेरले… गाडी फोडली, काळे फासले

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे आज हल्ला करण्यात आला. जमावाने त्यांना घेरले, काळे फासले आणि त्यांची गाडी फोडली. या घटनेने शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले असून, हल्ला करणाऱया कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा आरोप करत शिवधर्म फाऊंडेशनने हा हल्ला केल्याची माहिती आहे.

अक्कलकोट येथील प्रियदर्शनी सभागृहात श्री फत्तेसिंह शिक्षण संस्था व सकल मराठा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गायकवाड यांच्यावर झालेल्या अचानक हल्ल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला. काही जणांनी हस्तक्षेप करत त्यांना सोडविले.

हल्ल्यानंतर हल्लेखोर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन दीपक काटे व त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतले आहे. हल्लेखोर कार्यकर्ते इंदापूर येथील शिवधर्म फाऊंडेशनचे समर्थक व पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.

या प्रकरणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी दशरथ भोसले यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी संशयित आरोपी दीपक काटे, किरण साळुंखे, भैय्या ढाणे, भवानेश्वर शिरगिरे (सर्व रा. इंदापूर), कृष्णा क्षीरसागर, अक्षय चव्हाण, बाबू बिहारी (रा. बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

या हल्ल्यामागे भाजपचे गुंड – हर्षवर्धन सपकाळ

प्रवीण गायकवाड यांच्यावर भाजपच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध, असे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. आता महाराष्ट्राचा बिहार करूनच थांबणार आहात का, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केला.

पुरोगामी गप्प बसणार नाहीत – जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्रातील पुरोगामी संघटनांनी आता बोलायचेच नाही, त्यांच्या नेत्यांनी विरोधाचा आवाज काढायचाच नाही, यासाठी हा सगळा प्रकार सुरू आहे. पण गायकवाड आणि त्यांच्यासारखे लाखो पुरोगामी अनुयायी अशा भ्याड हल्ल्याने गप्प बसणार नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

भाजपाने पेरलेल्या विषाला उकळी फुटली – संजय राऊत

शिवरायांच्या मुलुखात हे काय सुरू आहे? भाजपाने पेरलेल्या विषाला उकळी फुटली आहे! महाराष्ट्र अराजकाच्या कडय़ावर उभा आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे.

हल्ल्याला सरकार जबाबदार, माझ्या हत्येचा कट होता!

माझ्या हत्येचा कट होता. या हल्ल्याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत, असे प्रवीण गायकवाड म्हणाले. हा हल्ला सरकार आणि भाजपपुरस्कृत होता. हल्लेखोर भाजपचे कार्यकर्ते होते. शिवधर्म प्रतिष्ठान हे नाव पुढे करून त्यांनी हे कृत्य केले. या कटाचा शोध घ्या, अशी मागणी त्यांनी केली.