
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने नगर शहरामध्ये दिवसेंदिवस महापुरुषांच्या बदनामीचे षडयंत्र करून नगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात असल्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोटारसायकल रॅली काढून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, महापौर रोहिणी शेंडगे, युवा सेना सहसचिव विक्रम राठोड, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सुरेखा कदम, सभापती गणेश कवडे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक शाम नळकांडे आदिंसह शिवसेनेच पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकार्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांची बदनामी करुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून शहरात अशांतता माजविण्याचा डाव केला जात असून, आगामी काळातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी काही नेते मंडळी विशिष्ट समाजाला हाताशी धरुन असे उद्योग करत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अल्पवयीन मुलांना महापुरुषांबद्दल अपशब्द वापरायला सांगून जातीय तेढ निर्माण करण्यास भाग पाडत आहेत.
शनिवारी रात्री मुकुंदनगर भागातील समाज कंटकांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशद्ब वापरुन सोशल मिडियावर ऑडिओ क्लिप तयार करुन प्रसारित केली. अशा समाज कंटकाविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन जिल्ह्यातून हद्दपार केलेच पाहिजे. अशा समाज कंटकांवर देशद्रोहाचे कलम लावण्यात यावे, जेणे करुन अशा घटना पुन्हा घडणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शहरप्रमुख संभाजी कदम म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून नगर शहरात महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करून वातावरण दूषित करत आहेत. अशा घटनांचे पडसाद राज्यभर उमटत असल्याने अशा प्रवृत्तीला वेळेच ठेचले पाहिजे. नगरमध्ये कायद्याचा धाक राहिलेला नाही, तरी शासनाने अशा व्यक्तींवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे, जेणे करुन पुन्हा अशा घटना घडणार नाही. अन्यथा आम्हालाच अशा लोकांचा बंदोबस्त करावा लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.



























































