
निवडणुकीच्या कामावर हजर न झालेल्या कर्मचाऱयांना महापालिका निवडणूक विभागाने नोटिसा पाठविल्या आहेत. मात्र या विभागाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. प्रशासनाने मृत्यू झालेल्या दोन शिक्षकांची निवडणुकीच्या कामासाठी नियुक्ती केली. याहून धक्कादायक बाब म्हणजे निवडणूक प्रशिक्षणासाठी अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांना नोटिसाही बजावल्या आहेत.
निवडणुकीच्या कामासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण 8 हजार मतदान पेंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. 28 डिसेंबर रोजी निवडणुकीच्या कामाबाबत छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. मात्र सुमारे 2 हजार कर्मचारी अनुपस्थित होते. त्यापैकी 1,200 कर्मचाऱयांना महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी नोटीस बजावली आहे. यात पैठण तालुक्यातील संभाजी कर्डिले आणि राजेश बसवे या मृत शिक्षकांनाही नोटीस बजावण्यात आल्याचे उघड झाले आहे.
मृत्यूची कागदपत्रे जमा करूनही नियुक्ती झाली कशी?
संभाजी कर्डिले यांचे 3 महिन्यांपूर्वी, तर राजेश बसवे यांचे 6 नोव्हेंबर 2024 रोजी निधन झाले आहे. मात्र त्यांना निवडणुकीच्या कामावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यांच्या कुटुंबीयांनी सर्व कागदपत्रे सादर केली होती. त्यानंतरही त्यांची नियुक्ती निवडणुकीच्या कामासाठी कशी करण्यात आली, असा प्रश्न कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.































































