मनपा आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी अधिकार्‍यास ठोठावला पाच हजाराचा दंड

332

महापालिकेचे नवीन आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी पदभार स्विकारताच प्लास्टिक बंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे संकेत कारवाईतून दिले. नगररचना विभागाचे सहायक संचालक नगररचनाकार आर. एस. महाजन यांनी स्वागत करण्यासाठी प्लास्टिकच्या कॅरीबॅगमधून पुष्पगुच्छ आणल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास येताच त्यांनी महाजन यांना पाच हजाराचा दंड ठोठावला.

महानगरपालिकेने शहरात प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी सुरु केली आहे. प्लास्टिक बंदी मोहिमेतंर्गत आतापर्यंत सुमारे पावणे दोन कोटीपर्यंत दंड वसुल करण्यात आला आहे. मनपाचे नवीन आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी आज सोमवारी आयुक्तपदाचा पदभार स्विकारला. पदभार स्विकारल्यानंतर मनपातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी पुष्पगुच्छ घेवून  आयुक्तांचे स्वागत करण्यास त्यांच्या दालनात जात होते. नगररचना विभागाचे सहायक संचालक नगररचना आर. एस. महाजन हे आपल्या सहकार्‍यांसह आयुक्तांच्या स्वागतासाठी प्लास्टिकच्या कॅरीबॅगमधून पुष्पगुच्छ घेवून गेले. प्लास्टिकच्या कॅरीबॅगमधून पुष्पगुच्छ आणण्यात आल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ स्विय सहायक अनिल बोंनडे यांना प्लास्टिकची कॅरीबॅग आणणारे नगररचनाकार महाजन यांना पाच हजार रुपयाची दंडाची पावती देण्याचे आदेश दिले. त्यानुसार महाजन यांना पाच हजार रूपयाची दंडाची पावती देत त्यांच्याकडून दंड वसुल केला. त्यानंतर दंड भरल्यानंतर महाजन यांनी पुष्पगुच्छ देऊन आयुक्तांचे स्वागत केले. नवीन आयुक्तांनी प्लास्टिक बंदीची कठोरपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचे त्यांच्या कृतीतूनच दाखवून दिले.

आपली प्रतिक्रिया द्या