
भाऊबीज सणासाठी माहेरी सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथे आलेल्या सविता श्रीराम ज्ञाने (४५) या शनिवार, २५ रोजी दुपारी ३.३० वाजता घाटनांद्रा येथील सासरी दुचाकीवरून येत होत्या. केळगाव येथील बसस्थानकावर बस मागे येत असताना दुचाकीला बसची मागची बाजू लागल्याने त्या दुचाकीवरुन खाली पडल्या. बसचे पाठीमागचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेले. यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
सिल्लोड आगाराची क्रमांक एमएच-२० बीएल-१५२२ ही सिल्लोड-मुर्डेश्वर बस केळगाव बसस्थानकावर प्रवासी उतरवून पुढे जात असताना हा अपघात घडला. त्या वेळी सविता ज्ञाने या मोटारसायकलवर बसस्थानकाजवळ थांबल्या होत्या. बस मागे येत असताना अचानक त्यांना बसची मागची बाजू लागून मागच्या चाकाखाली चिरडल्या गेल्या. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तत्काळ सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. सविता ज्ञाने या दिवाळीनिमित्त माहेरी आल्या, मात्र आनंदाच्या सणातच त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत सविता यांच्या पार्थिवावर घाटनांद्रा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू, सासरे, दीर असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार अनंत जोशी हे करीत आहेत.




























































