
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
शहराच्या विविध भागांतील मंडईत भाजी खरेदीच्या बहाण्याने मोबाईल लंपास करणाऱ्या परप्रांतीय त्रिकुटास बेगमपुरा पोलिसांनी शहागंज भागातून अटक केली. तिघांच्या ताब्यातून दहा महागडे मोबाईल आणि भाजी, कोथिंबीर, लिंबू, गाजरे असा भाजीपालाही जप्त करण्यात आला आहे. काम फत्ते झाल्यानंतर हे चौघे गावाकडे रवाना होणार होते. त्यांच्याकडे रेल्वेचे आजचे रिटर्न तिकीटही सापडले.
रोशनगेट परिसरातील कैसर कॉलनीतील सरफराज सिद्दीकी हे आज सकाळी बेगमपुरा परिसरातील थत्ते हौदाजवळ भाजी खरेदी करीत असताना चोरट्यांनी त्यांचा मोबाईल अलगदपणे लंपास केला. या प्रकरणी सिद्दीकी यांनी तात्काळ बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलीस निरीक्षक राजश्री आडे, उपनिरीक्षक राहुल रोडे यांच्या पथकाने चोरट्यांचा शोध सुरू केला असता चोरटे हे शहागंज मंडईत फिरत असल्याची माहिती मिळाली. राहुल रोडे यांच्या पथकाने गुजरात, सुरत येथील चंदनकुमार उमेश महथो (२८), झारखंड येथील रविकुमार महावीर शर्मा (२१) संतोषकुमार मंडल, पश्चिम बंगाल येथील सुनील कुमार प्यारे पासवान या चौघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता पिशवीत दहा महागडे मोबाईल आणि मिरची, भाजी, कोथिंबीर, लिंबू, गाजरे, सापडली. त्यांनी बेगमपुरा, शहागंज, जाधववाडी येथील भाजी मंडईतून विविध महागडे मोबाईल लंपास केल्याची कबुली दिली.
एका दिवसाचे टार्गेट
झारखंड येथील मोबाईल चोरणारी टोळी झारखंड, पश्चिम बंगाल आणि गुजरात येथून एका दिवसासाठी संभाजीनगरात येत असते. संभाजीनगरात आल्यानंतर ही टोळी भाजीपाला खरेदीच्या बहाण्याने जाधववाडी, शहागंज, पीरबाजार, मोंढा अशा विविध आठवडी बाजारांत समूहाने शिरते. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचे मोबाईल अलगदपणे लंपास करीत असे. या त्रिकुटाने आज दिवसभर बेगमपुरा, जाधववाडी आणि शहागंज भागातील मंडईवर हात साफ करून दहा मोबाईल चोरी केले. मोबाईल चोरी केल्यानंतर ही टोळी आज झारखंडच्या दिशेने रवाना होणार होती. त्यांच्याकडे रेल्वेचे रिटर्न तिकीटही पोलिसांना सापडले. उपनिरीक्षक राहुल रोडे यांच्या सर्तेकतेमुळेच मोबाईल चोरणारी टोळी हाती लागली. या टोळीने सहा महिन्यांत लाखो रुपयांचे मोबाईल लंपास केल्याची कबुली दिली.
तिघांनी घेरल्यावर तो करत होता हात साफ
ज्याच्या खिशात महागडा मोबाईल आहे, त्याला हे चौघे घेरत होते. हातगाडीवर भाजीचा भाव करण्यास सुरुवात करताच एक समोरून तर दोन शेजारी उभे राहून भाजीचा भाव करतात. तिघांनी घेरल्यावर एक अल्पवयीन मुलगा गर्दीत घुसून मोबाईल लंपास करतो. त्यानंतर मात्र तिघेही कोणतीही वस्तू खरेदी न करता तेथून निघत असत, अशी माहिती या चोरट्यांनी पोलिसांना दिली.




























































