
बंदुकीच्या जोरावर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या तेजाचा प्रताप मैत्रिणीवर गोळीबार केल्याने समोर आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आरोपी तेजाला पोलीस घेऊन जात असताना त्याने आणखी दोन ते तीन मुलींना ठार मारण्याची धमकी पोलिसांच्या समोर दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. अटकेतील आरोपीने पोलिसांसमोर अशी धमकी दिल्याने अखेर पोलिसांनी आज बुधवारी त्याची परिसरातून धिंड काढली.
फैसल उर्फ तेजा सय्यद (रा. किलेअर्क) हा तुरुंगातून सुटून आला होता. त्याने सोमवारी, ११ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास त्याच्या मैत्रिणीवर पिस्तूल रोखत गोळीबार केला. गोळी हाताला लागल्याने ती जखमी झाली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी गेले होते. या प्रकरणी राखी मुरमुरे हिने दिलेल्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तेजाला अटक केली होती.
दरम्यान, तेजाची वाढती दहशत कमी करण्यासाठी शहर पोलिसांनी बुधवारी आमखास मैदान ते किलेअर्क या मार्गावर त्याची दहशत असलेल्या परिसरातून त्याची धिंड काढली. तेजाची यापूर्वीही एप्रिल महिन्यात त्याची टिव्ही सेंटर परिसरात धिंड काढली होती. मात्र, त्यानंतरही त्याच्या गुन्हेगारीचा आलेख हा चढताच राहिला आहे.
मैत्रिणीवर गोळीबार करणाऱ्या तेजाला पोलीस घेऊन जात असताना त्याने आणखी दोन ते तीन मुलींना ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर पोलिसांनी त्याची धिंड काढली. pic.twitter.com/vsS48Bi2ek
— Saamana Online (@SaamanaOnline) August 14, 2025
पोलिसांनी केले पिस्तूल हस्तगत
फैसलवर एनडीपीएस अॅक्टसह विविध कलमांखाली १९ गंभीर गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल आहेत. बेगमपुऱ्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडून पिस्तूल जप्त केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांनी दिली.
गुन्हा घडल्यानंतर कळले… पिस्तूल आहे
शहरातील गुन्हेगारी कारवाया दिवसेंदिवस वाढत आहेत. चाकू, कोयता, गुप्ती, तलवारांसह आता थेट पिस्तूलही गुन्हेगारी कारवायांसाठी वापरले जात आहे. मात्र, हा प्रकार केवळ गुन्हा घडल्यानंतरच समोर येतो. त्यामुळे शहरातील गुन्हेगारांकडे पिस्तूल येईपर्यंत पोलिसांना कुठलीच खबर मिळत नसेल तर ते दुर्दैव आहे. संवेदनशील शहरात अशा प्रकारे किती गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडे पिस्तूल आहे, याचा शोध पोलीस कधी घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.