
विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्याचा निर्णय झाला असतानाही आमदार विनय कोरे यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटाव समितीला विचारात न घेताच अतिक्रमणधारकांसोबत एकतर्फी बैठक घेण्याचा प्रयत्न केल्याने शिवप्रेमींकडून तीक्र संताप व्यक्त होत आहे. यासंदर्भात शे-पाचशे मतांसाठी विशाळगडाच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करू नये. गडावरील अतिक्रमणांत मतांचे राजकारण नको; अन्यथा शिवप्रेमी जनताच धडा शिकवेल, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी आमदार विनय कोरे यांना दिला आहे.
संभाजीराजे यांनी दीड महिन्यापूर्वी समस्त शिवभक्त व दुर्गप्रेमी मंडळींसह किल्ले विशाळगडाची पाहणी करून जिल्हा प्रशासनासोबत विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्यांसंदर्भात घेतलेल्या बैठकीस गडाचे अतिक्रमण केलेले रहिवासी, दुर्गप्रेमी संस्था, संबंधित प्रशासकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांना निमंत्रण होते. मात्र, लोकप्रतिनिधींनी या बैठकीकडे पाठ फिरविली होती. संभाजीराजे छत्रपती यांच्यासह कोल्हापूर जिल्हाधिकारी, मुख्य वनसंरक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत सर्व बाजू ऐकून घेऊन विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटविण्याचा एकमुखी निर्णय झालेला होता. तसेच महाशिवरात्रीपूर्वी ही सर्व अतिक्रमणे हटविण्याची कारवाई पूर्ण केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱयांनी दिले होते.
या पार्श्वभूमीवर विशाळगड अतिक्रमणांबाबत शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांनी काल जिल्हा प्रशासनासोबत परस्पर बैठक बोलाविली. या बैठकीला विशाळगडावर अतिक्रमण करणाऱया रहिवाशांना निमंत्रण होते; पण कोणत्याही दुर्गप्रेमी संस्थेला याबाबत कोणतीच कल्पना देण्यात आली नव्हती. यावर शिवप्रेमींनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला संताप व्यक्त केला होता. त्यात आमदार कोरे या बैठकीला आलेच नसल्याने ही बैठक रद्द झाली. त्यामुळे संभाजीराजे यांनी संताप व्यक्त केला.
संभाजीराजी म्हणाले, ‘‘विशाळगडावरील अतिक्रमणे हटविण्याचा निर्णय झालेला असतानाही स्थानिक आमदार पुन्हा एकदा परस्पर व गुपचूप प्रशासकीय बैठक लावून काय साध्य करू पाहत आहेत? आमदारांनी शे-पाचशे मतांसाठी विशाळगडाच्या अस्तित्वावर घाव घालण्याचा प्रयत्न करू नये. आजपर्यंत तुम्ही जाणीवपूर्वक अतिक्रमणे पाठीशी घातल्यानेच विशाळगडाची ही विषण्ण अवस्था झाली आहे. अजूनही गडावर सुरू असलेल्या कारवाईवर दबाव आणून ती बंद पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आता शिवभक्त जागा झाला आहे. तुमची मतांची गोळाबेरीज विशाळगडाच्या बाबतीत चालू देणार नाही,’’ असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, आमदारांच्या या गुपचूप बैठकीचा राजकीय डाव उधळणाऱया दुर्गप्रेमी शिवभक्तांचे अभिनंदन करीत प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे महाशिवरात्रीच्या आधी विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटविलीच पाहिजेत, अशी मागणीही संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.


























































