आगळं वेगळं – भिन्न देशांतील ‘सेम गावे’

934

>> मंगल गोगटे

देशातील देशात गावांची नावे सारखी आढळतात. मात्र आपल्या देशातील काही शहरे आणि गावे यांची नावे परदेशांमध्येही तशीच आहेत. अशी तब्बल 13 गावे आहेत, ज्यांचा देश भिन्न आहे; पण नाव सेम आहे.

आपल्या देशातील कोणत्याही गावाचं नावं आपल्याला आपलं वाटतं; परंतु अशी आपली वाटणारी अनेक शहरांची/ गावांची नांवं देशाबाहेरही सापडतात. अशी किती गावं असतील? अशी एक दोन नाही, तर 13 आहेत.

दिल्ली (हिंदुस्थान व अमेरिका) : आपण आपल्या राजधानीपासून सुरू करूया. जसं आपलं दिल्ली आहे तसंच देल्वरमधे अमेरिकेतही एक दिल्ली आहे. हे देल्वरच्या ईशान्येकडे आहे आणि तिथे प्रसिद्ध सनी विद्यापीठ आहे. देल्वर नदी या भागाला पेनसिल्वानिया राज्यापासून वेगळं करते. 23 मार्च 1798 ला, मिडलटन, कोर्टराइट आणि वॉल्टन या तीन गावांना एकत्र करून, ‘द ग्रेट मुगल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्य़ा एबेनझर फूटी याने या भागाला दिल्ली असं नांव दिलं.

कोची (केरळ व जपान) : आपल्याकडे केरळची व्यापारी, औद्योगिक आणि आर्थिक राजधानी कोची आहे. त्याच नावाची एक जागा जपानमध्ये आहे. या दोन्ही जागांमध्ये आणखी एक साम्य आहे, येथील जनतेचं मासे खाण्याबाबतचं प्रेम.

लखनौ (उत्तर प्रदेश व अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया) : डॉफिन परगण्यामधील एक भाग लखनौ म्हणून ओळखला जातो. तिथे 5500 एकर जमिनीवर 16 खोल्यांची एक हवेली आहे. ही जागा लखनौ म्हणून प्रसिद्ध आहे. अमेरिकेत तीन ठिकाणी लखनौ नांवाचं गाव आहे. ती आहेत साऊथ कॅरोलीना, पेनसिल्वानिया आणि मिनीसोटा या राज्यांमधे. कॅनडामधे ऑन्टॅरिओ इथे आणि ऑस्ट्रेलियामधे व्हिक्टोरिया आणि साऊथ वेल्स इथेदेखील लखनौ आहे.

हैदराबाद (आंध्र प्रदेश व पाकिस्तान) : दोन्ही देशातील हैदराबादला राजघराण्यांचा भूतकाळ आहे. आपल्याकडे पूर्वीच्या गोवळकोंडा येथील दुष्काळामुळे आता हैदराबाद आहे तिथे जाण्याचं मुहम्मद कुली कुतुबशाहने 1589 मध्ये ठरवले. नंतर त्याला आवडणाऱ्य़ा भागमती या तेलगू नर्तकीने मुस्लिम धर्म व हैदर महल हे नांव स्वीकारल्यावर या नवीन जागेचं नांव हैदराबाद असं ठरवलं.

कलकत्ता (कोलकाता- पश्चिम बंगाल व अमेरिका) : कलकत्ता हे अमेरिकेतील कोळशाचं शहर 1870 मधे वसलं त्यावेळी तिथे फारशी मोठी वस्ती नव्हती. हुगळी नदीच्या काठावरील आपल्या कलकत्ता (आता कोलकाता) मध्ये मात्र सगळय़ा छान व विशेष गोष्टी एकत्र आल्या.

सेलम (तामीळनाडू व अमेरिका) : तामीळनाडूतील हे गाव कोईमतूरच्या ईशान्येला आहे आणि थिरूमनीमुथारू नदीच्या काठावर वसलं आहे. अमेरिकेतील सेलम हे नौम्कीआग या नदीच्या मुखाशी आहे. सुमारे 1626 मधे जुनं सरकार बदलून तिथे नवीन सरकार अगदी शांतपणे आलं आणि शांतीला हिब्रू शब्द आहे सेलम. म्हणून या गावाचं नांव सेलम.

बडोदा (गुजराथ व अमेरिका) : आपले बडोदा परंपरेनेच तोंडाला पाणी सुटेल अशा खाद्यपदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. मायकल हौसरने 1.7 चौरस किमीमधे एक गांव अमेरिकेत तयार केलं. त्याला त्याचं नांव पोमोना ठेवायचं होतं, पण त्याला लक्षात आलं की ते नांव आधीच कुणीतरी घेतलेलं होतं. त्यामुळे त्यांनी सी. एच. पिंदर यांनी सुचवलेलं बडोदा हे नांव स्वीकारलं. हे पिंदर यांचं जन्मगांव आहे.

ढाका (बिहार व बांगलादेश) : आता बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकाला विभाजनाच्या दुःखद इतिहासाची झालर आहे. बिहारमधील ढाका पूर्व चंपारणमध्ये आहे. महात्मा गांधींनी इथूनच ‘चंपारण सत्याग्रह’ला सुरुवात केली होती.

इंदोर (मध्य प्रदेश व अमेरिका) : मध्य प्रदेशातील इंदूरला वैभवशाली इतिहास आहे. अमेरिकेच्या पश्चिम वर्जिनियातील इंदोर या गावाचं नांव हिब्रूमधील एंदोर या शब्दावरून आलं आहे. याचा अर्थ वसाहत वा वसंत (ऋतू) असा होतो.

ठाणे (महाराष्ट्र व ऑस्ट्रेलिया) : ठाणे हे मुंबईला अगदी जवळचं एक शहर आहे, पण संपूर्ण ठाणे जिल्हा तेथील सुंदर समुद्रकिनाऱ्य़ांसाठी प्रसिद्ध आहे. ऑस्ट्रेलियातील ठाणे मोठय़ा शहरांपासून दूर आहे. इथे फारसे प्रवासी येत नाहीत.

बाली (राजस्थान व इंडोनेशिया) : राजस्थानातील पाली जिल्ह्यातील एका लहानशा गावाचं नांव आहे बाली. इंडोनेशियातील बाली मात्र प्रवाशांचं आवडतं ठिकाण आहे.

अलमोरा (उत्तराखंड व अमेरिका) : हे उत्तरखंडमधील अत्यंत रम्य थंड हवेचे ठिकाण आहे. अमेरिकेतील इलिनॉइस राज्यातही एक ‘अलमोरा’ या नावाचे एक गाव आहे.

पाटणा (बिहार व स्कॉटलंड) : स्कॉटलंडमधील एका गांवाचं नांव आपल्याकडच्या बिहारची राजधानी पाटणा नांवावरून पडलं. विल्यम फुलरटन याने हे गांव वसवलं. विल्यमचे वडील आर्मी ऑफिसर म्हणून ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी करत होते आणि पाटणा येथे होते. विल्यमचा जन्म पाटण्यात झाला. आपल्या जन्मगावाची आठवण म्हणून त्याने स्कॉटलंडमध्ये गेल्यावर तिथल्या गावाचं नांव पाटणा असं ठेवलं.

अशी खूप गावं असू शकतील, जसं फरीदकोट-पंजाब व पाकिस्तानात आहे. गावांची नांवं सारखीच असली तरी त्यांचा एकमेकांशी खूप साधर्म्य असेलच असं नाही. तरीही ते नांव ऐकलं की आपल्या मनात आपलेपणाची भावना जागी होते. जर का त्या ठिकाणी भेट दिली तर आपली नजर कुठेतरी तोच समान भास होतोय का हे शोधत भिरभिरत राहते.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या