
>> प्रा. समीर जाधव
‘मराठय़ांची (भोसले घराण्याची) सत्ता’ असलेले तामीळनाडूतील तंजावर हे महाराष्ट्रासाठी कायम कुतूहल जागे ठेवणारे गाव. दक्षिण हिंदुस्थानात कला-संस्कृतीचे केंद्र म्हणून ओळखले जाणाऱया तंजावरचा इतिहास टप्प्याटप्प्यात बदलत गेला. मात्र तिथले कलावैभव हा आजही अभ्यासाचा, औत्सुक्याचा विषय ठरतो. तंजावरचा हा प्राचीन ते अर्वाचिन प्रवास उलगडत तिथल्या ऐतिहासिक, राजकीय, सांस्कृतिक पार्श्वभूमीवर अधिक प्रकाश टाकणारे हे सदर.
तामीळ चित्रपटसृष्टीमध्ये सांस्कृतिक, ऐतिहासिक व सौंदर्यात्मक दृष्टीने कावेरी नदीच्या खोऱयातील तंजावर (ऊप्aहरन्ल्r) या प्रदेशाला विशेष महत्त्व आहे. तंजावरची राजसत्ता, संस्कृती आणि त्यासंबंधी मिथकथांवर आधारित डझनभर तामीळ चित्रपट आहेत. महाराष्ट्री तंजावर या प्रदेशाचे कुतूहल आहे ते ‘मराठय़ांची (भोसले घराण्याची) सत्ता’ या कारणासाठी. मोगलांचे साम्राज्य भारतभर पसरलेले असतानाच्या काळात राजकीय कारणामुळे महाराष्ट्रातून तंजावर येथे स्थलांतरित झालेल्या भोसले घराण्यातील व्यक्तींनी राजेपदापर्यंत प्रवास केला. त्यांनी तेथे जवळपास एकशे पंच्याऐंशी वर्षे अव्याहत राज्य केले. शहाजीराजे भोसले यांचा पहिला पुत्र व्यंकोजी हा तंजावरमधील पहिला मराठी राजा होय. त्यानंतर प्रतापसिंहराजे ते शरभेन्द्र ऊर्फ सरफोजींपर्यंत अबाधित राजसत्ता भोसले घराण्याकडे राहिली. 1676 ते 1885 इतका प्रदीर्घ कालखंड हा मराठय़ांचा होता. तंजावरमध्ये मराठय़ांची सत्ता कशी आली? ती येण्यापूर्वी तंजावरची राजकीय सांस्कृतिक पार्श्वभूमी काय? यांचा विचार केल्याशिवाय भोसलेकाळात नाटय़, नृत्य, संगीत या कलांचे केंद्र बनलेल्या तंजावरचा अभ्यास अपूर्ण आहे.
तंजावरचे प्राचीन नाव ‘अलगाई’ होते. तंजावरला दक्षिणेचे एडन असे म्हटले जाते. ‘भविष्यपुराण’, ‘ब्रह्मांडपुराण’, ‘शमीवन महात्म्य’, ‘चोळचंपू’ या पुराणग्रंथात तंजावरचा उल्लेख सापडतो. ‘शेषकवीकृत तंजपुरी महात्म्य’ या स्थलपुराणामध्ये तंजावर या नगरीची स्थापना कशी झाली याबद्दलची आख्यायिका येते. या आख्यायिकेनुसार ‘थंजन’/ ‘तंजन’ नावाच्या असुराने ही नगरी स्थापन केली. ब्रह्मदेवाच्या वरप्रसादाने उन्मत्त झालेल्या तंजासुराने देवादिकांना त्रास देण्यास सुरुवात केली म्हणून आनंदवल्ली (आदिशक्ती) या देवीने त्याचा वध करण्यासाठी त्याच्याशी युद्ध केले. मरणासन्न तंजासुराने आपले नाव या नगराला देण्यात यावे अशी विनंती आनंदवल्लीला केली. ती विनंती देवीने मान्य करून त्या नगराला ‘तंजावर’ हे नाव दिले. पुढे इंग्रजांनी त्याचा उल्लेख ‘तंजोर’ असा केला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यंकोजी महाराजांना पाठविलेल्या एका पत्रात पुढील मजकूर आहे- त्या करारबाबेमध्ये होसकट व बंगलूर व चंजाऊर आदी करून तुमीचे निसबती आम्ही आपणासीच लाऊन घेतली. यामध्ये तंजावरचा उल्लेख ‘चंजाऊर’ असा आहे, तर ‘तंजापुरी’ असा शब्द पहिला राजेंद्र चोल याच्या वेळच्या तिरूवलंगडू ताम्रपटांत आढळतो. इतिहासात सर्वप्रथम तंजावरचा उल्लेख चोल राजवटीपासून येतो. विंध्याद्रीपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या हिंदुस्थानच्या त्रिकोणाकृती प्रदेशास ‘दक्षिणापथ’ अशी संज्ञा होती. या प्रदेशाचे मुख्य तीन भाग असून चोल, पाण्डय़ आणि चेर या राजसत्तांमध्ये हा दक्षिणपथ विभागलेला होता. या तीन देशांपैकी दक्षिण हिंदुस्थानमध्ये मद्रास इलाख्याच्या पूर्व किनाऱयास (तेलंगणाच्या दक्षिणेस) जो भाग आहे तो प्राचीन चोल प्रांत होय.
भारताच्या दक्षिण भागातील प्राचीन व वैभवशाली राजवंशांमध्ये चोल राजवटीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तामीळनाडूच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक इतिहासात चोलांनी अनेक शतकांपर्यंत प्रभुत्व गाजवले. चोल राजवटीचा उल्लेख संगम साहित्यामध्ये आढळतो. काही काळ चोलांचे सामर्थ्य कमी झाले असले तरी इ.स. 9 व्या शतकात त्यांच्या साम्राज्याचे पुनरुज्जीवन झाले.
(लेखक तंजावरची कला, संस्कृती, साहित्य याचे अभ्यासक आहेत.)
[email protected]































































