समृद्धी महामार्गावर अर्टिगा गाडीला भीषण अपघात, सहा जण ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समृद्धी महामार्गावर मेहकर-सिंदखेड राजा दरम्यान झालेल्या छत्रपती संभाजीनगर येथून शेगावला दर्शनासाठी जाणाऱ्या अर्टिगा गाडीला अपघात होऊन सहा जण ठार झाले असून सात जण जखमी झाले आहेत. महामार्गावर लोणार तालुक्यातल्या शिवणी पिसानजीक हा अपघात झाला.

ही दुर्घटना रविवारी सकाळी घडली. भरधाव वेगाने आलेल्या अर्टिगा गाडीची दुभाजकाशी धडक होऊन ती पलटली. तीन ते चार वेळा पलटी झालेली गाडी बाजुच्या रस्त्यावर कोसळली. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले. तर उर्वरित दोघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिला, एक लहान मूल आणि चालकाचा समावेश आहे. या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. बहुतांश जखमी हे छत्रपती संभाजीनगर शहरातील एन 11 मधील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे. या भीषण अपघातात हौसाबाई भरत बर्वे (75), श्रद्धा सुरेश बर्वे (28), जान्हवी सुरेश बर्वे (11), किरण राजेंद्र बोरुडे (28), भाग्यश्री किरण बोरुडे (25), प्रमिला राजेंद्र बोरुडे (52) हे ६ जण जागीच ठार झाले तर नम्रता रवींद्र बर्वे (32), रुद्र रवींद्र बर्वे (12), यश रवींद्र बर्वे (10), सौम्य रवींद्र बर्वे (4), जतीन सुरेश बर्वे (4), वैष्णवी सुनील गायकवाड (19) व चालक सुरेश भरत बर्वे (35) हे जखमी झाले असून, प्राथमिक उपचारानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील सिटी केअर रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

अपघातातील जखमींना प्रथम मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. अपघातातील गंभीर जखमींना आता तिथून अन्यत्र हलवण्यात येत आहे. या वाहनामध्ये जवळपास 13 जण होते, अशी माहिती आहे.