ग्रामीण शाश्वत विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत सातारा जिह्यातील शिरवळ गावात शिरवळ समृद्धी – एकात्मिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प याचे भव्य उद्घाटन व औपचारिक हस्तांतरण सोहळा नुकताच पार पडला. एसीजी ग्रुपचे अध्यक्ष अजित सिंग यांच्या हस्ते हा अत्याधुनिक प्रकल्प औपचारिकरीत्या ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आला. या सोहळ्यास सातारा जिह्याचे मा. जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद साताऱ्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन, एसीजी केअर्स फाऊंडेशनचे संचालक सुनील झा, एसीजी फार्मापॅकचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. आर. शिवशंकर, एसीजी ग्रुपचे शाश्वतता व सीएसआर प्रमुख सुनील कुमार तसेच शिरवळ ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
शिरवळ समृद्धी हा ग्रामीण भागातील एकात्मिक कचरा व्यवस्थापनाचा एक अग्रगण्य नमुना असून एसीजी केअर्स फाऊंडेशनच्या संकल्पनेतून साकारला आहे. या प्रकल्पाची तांत्रिक अंमलबजावणी सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एज्युकेशन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून कार्यान्वयन श्रीष्टी वेस्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेसतर्फे केले जात आहे.
सुमारे 12 हजार नागरिकांमधून दररोज निर्माण होणारा जवळपास 15 मेट्रिक टन कचरा प्रक्रिया करण्याची क्षमता या केंद्रात आहे. व्यापक स्तरावर हा प्रकल्प सुमारे 60 हजार लोकसंख्येपर्यंत सेवा देऊ शकतो. ग्रामपंचायत शिरवळने या प्रकल्पासाठी सुमारे 60 हजार चौरस फूट जमीन विनामूल्य उपलब्ध करून दिली तसेच वीज व पाणी सुविधा पुरविल्या. सरपंच रविराज दुधगावकर यांच्या नेतृत्वाखाली गावात 90 टक्क्यांपेक्षा अधिक स्रोत पातळीवरील कचरा वर्गीकरणाची अंमलबजावणी करण्यात आली आहे, जे ग्रामीण कचरा व्यवस्थापनात एक उल्लेखनीय यश मानले जाते.




























































