
जगातील सर्वात मोठ्या चिप उत्पादकांपैकी एक असलेल्या सॅमसंग कंपनीतील सुमारे 45 हजार कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. हा कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठा संप असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, हे कर्मचारी कंपनीच्या मेमरी चिप प्लांटमध्ये काम करत आहेत, जिथे एआय, स्मार्टफोन, लॅपटॉप आणि सर्व्हरसाठी आवश्यक असलेल्या चिप्सचे उत्पादन केले जाते.
सॅमसंगच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांना चांगले पगार, बोनस आणि कामाची परिस्थिती हवी आहे. एआयच्या तेजीमुळे कंपनीचा नफा वाढला आहे, पण कर्मचाऱयांना त्याचा फायदा मिळालेला नाही. ही नाराजी आता एका मोठय़ा चळवळीत बदलताना दिसत आहे. एआयमुळे चिप्सची मागणी पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. चॅटजीपीटी, डेटा सेंटर्स आणि नवीन तंत्रज्ञानासारख्या साधनांना मोठ्या प्रमाणात मेमरी चिप्सची आवश्यकता असते. सॅमसंग या पुरवठा साखळीचा एक प्रमुख भाग आहे. येथील उत्पादन थांबले तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतो.
…तर स्मार्टफोन, लॅपटॉप महागणार
कर्मचाऱयांचा हा संप दीर्घकाळ चालला तर त्याचा पहिला परिणाम चिप्सच्या पुरवठय़ावर होईल. चिप्सच्या कमतरतेमुळे पंपन्यांना उत्पादने बनवणे कठीण होईल. याचा परिणाम म्हणजे स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढू शकतात. आज बँकिंग, आरोग्य सेवा, ऑटोमोबाईल आणि सरकारी यंत्रणादेखील चिपवर अवलंबून आहेत. त्यामुळे पुरवठय़ातील तुटवडय़ाचा परिणाम अनेक क्षेत्रांवर परिणाम होऊ शकतो.

























































