कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणणारच! मुख्यमंत्र्यांनी वाहिली सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीमाप्रश्नात सर्वस्वाची होळी करणारे हुतात्मे आणि त्यांच्या त्याग, समर्कणात होरपळूनही आजही या लढ्यात धीराने आणि नेटाने सहभागी कुटुंबीयांना मानाचा मुजरा! कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमा लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्नाटक-महाराष्ट्र सीमा लढ्यातील हुतात्म्यांना हुतात्मा दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. कर्नाटकव्याप्त प्रदेश महाराष्ट्रात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी अभिवादनात  केला आहे.

कर्नाटकव्याप्त मराठी भाषिक आणि सांस्कृतिक प्रदेश महाराष्ट्रात आणणे हीच या सीमा लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांना आदरांजली ठरणार आहे. त्यासाठी आम्ही एकजूट आणि कटिबद्ध आहोत, अशा भावना मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

सीमा लढ्यातील मराठी गावे तत्कालीन म्हैसूर राज्याला अन्यायकारक पद्धतीने जोडण्यात आली. हा अन्याय दूर करण्यासाठी मराठी बांधवांचा लढा अखंड सुरू आहे.

संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील आंदोलकांवर 18 जानेवारी 1956 रोजी मुंबईत गोळ्या चालवण्यात आल्या. त्यात महाराष्ट्राचे दहा सुपुत्र शहीद, तर अडीचशेहून अधिक जण जखमी झाले होते. शहीदांना श्रद्धांजली तर जखमी झालेल्या सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांबद्दलही उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

कर्नाटक सीमा भागातील मराठी गावे महाराष्ट्रात आणून संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत महाराष्ट्र शांत बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

सीमा भागातलं शेवटचं मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत शांत बसणार नाही

बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह कर्नाटक सीमा भागातील सर्व मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात सामील करून संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करणे, कर्नाटकव्याप्त शेवटचं  मराठी गाव महाराष्ट्रात येईपर्यंत सर्व शक्तीनिशी, निर्धारानं लढत राहणं हीच सीमा लढ्यातील हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीमा लढ्यातील हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले.