
सामना प्रतिनिधी, औसा
तालुक्यातील तावरजा, मांजरा आणि तेरणा नदीपात्रातील अवैध वाळुचा उपसा गेल्या चार महिन्यापासून मोठ्या प्रमाणात होत आहे. याकडे महसूल विभागाने पाठ फिरवली असल्यानेच तालुक्यात हजारो ब्रास वाळू साठा झाला आहे.
तालुक्यातील भादा, बेलकुंड, मातोळा, किनीथोट, लामजना, किल्लरी आणि औसा या सातही महसुल मंडळात मोठ्या प्रमाणत वाळुचे साठे करून ठेवण्यात आलेले आहेत. एका वहानाला महिन्याला 35 हजार रुपयाचा हप्ताही ठरला. एका महसुली मंडळात कमीत कमी 50 वाहने जरी धरले तरी 17 लाख 50 हजार रुपये होतात, असे एकुण औसा तालुक्यात सात महसुली मंडळाचे धरले तर 350 वाहने होतात आणि त्याची रक्कम होते 1 कोटी 22 लाख 50 हजार रुपये महिन्याचे होतात असे चारच महिने वहानचालकाने वहान चालवले तर चार महिन्याचे ४ कोटी ९० लाख रुपयाचे चार महिन्यातच या वाळू तस्करीत जमा झालेले आहेत. आणि एवढी मोठी रक्कम नेमकी कोणाच्या घशात गेली याची खऱ्या अर्थाने चौकशी होणे गरजेचे आहे.
तालुक्यात 10 वाळूघाट असून यावर्षी एकाही वाळूघाटाचा लिलाव झाला नसल्याने गावपातळीवरील अधिकारी व पुढारी यांनी या वाळूचा गैरवापर सुरू केला. याबाबत नायब तहसीलदार शिवाजी कदम यांना विचारले असता झालेला प्रकार चुकीचा आहे. यात जे -जे दोषी आढळून येतील त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार असून यापुढे असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घेतली जाईल, असे दै. सामनाशी बोलतांना सांगितले.






























































