ठसा : राजेंद्र शिंदे

>>संदीप देशमुख<<

विद्वान सर्वत्र पुज्यते’ असे म्हटले जाते. समाजात वावरताना पदोपदी त्याचा प्रत्ययही येतो. उपजत प्रज्ञेला जात-पात, धर्म-पंथ अशा कुठल्याही मर्यादा असू शकत नाहीत. किंबहुना त्या नसाव्यातच. मूळच्या नगर जिल्हय़ातील असलेल्या आणि सध्या मुंबईच्या सेंट झेवियर्स या ख्यातकीर्त महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र्ा विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र शिंदे यांच्या बाबतीतही वरील उक्तीची प्रचीती येते. गुणवत्तेचा दर्जा, कडक शिस्त, सातत्याने नवोन्मेष घडविण्याची उैर्मी आणि विद्यार्थीपूरक धोरण यामुळे मुंबईत या महाविद्यालयाचा कमालीचा दबदबा आहे. येथे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ असते. अशा या गुणसंपन्न महाविद्यालयाला दीडशे वर्षांचा गौरवशाली इतिहास आहे, परंतु आजवरच्या काळात कधीही बिगरख्रिस्ती माणूस महाविद्यालयात प्राचार्यांच्या खुर्चीवर बसला नाही. तो मान मिळतो आहे राजेंद्र शिंदे या मराठमोळय़ा व्यक्तीला. त्यातही शिंदे हे महाविद्यालयाचे पहिलेच मराठी प्राचार्य ठरणार आहेत. याच महाविद्यालयात १९८०मध्ये विद्यार्थी म्हणून शिंदे यांनी प्रवेश घेतला होता. पुढे याच महाविद्यालयात त्यांनी ३५ वर्षे अध्यापनाचे कार्य केले. १९८३मध्ये ते उपप्राचार्य झाले. आता येत्या १ सप्टेंबर रोजी महाविद्यालयाचे २४ वे प्राचार्य म्हणून ते पदभार स्वीकारतील.

सेंट झेवियर्स महाविद्यालयाचा सर्व कारभार ख्रिश्चन मिशनऱ्यांकडून चालविला जातो. दिल्ली, चेन्नई, कोलकात्यातही अशीच ख्रिश्चन महाविद्यालये आहेत. तिथेही आजवर बिगरखिस्ती माणूस प्राचार्य झालेला नाही. मुंबईतील महाविद्यालयाच्या संचालक मंडळाने मात्र हा संकेत मोडीत काढून शिंदे यांच्या नावावर मोहोर उठवली आहे. वयाची ५५ वर्षे पूर्ण केलेले राजेंद्र शिंदे तसे मूळचे नाशिक जिल्हय़ातले. ओढा हे त्यांचे गाव. प्राथमिक शिक्षण गावातल्या एकुलत्या एका शाळेतच झाले. पुढच्या शिक्षणासाठी त्यांनी मुंबई गाठली आणि मुंबईकर झाले. तरीही वनस्पतीशास्त्र्ाातील अभ्यासाच्या नात्याने मात्र गावाशी नाळ जुळलेलीच राहिली. नांदुरमधमेश्वरच्या धरण क्षेत्रातील वृक्षवल्ली त्यांच्या अभ्यासाचा विषय ठरल्या. महाविद्यालयाच्या प्राचार्य पदासाठी १२ मान्यवरांचे अर्ज आले होते. त्यातून शिंदे यांच्यासह चार जणांची यादी अंतिम करण्यात आली आणि अखेरीस शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.

खेडय़ातून आलेल्या आपल्यासारख्या माणसाच्या खांद्यावर मुंबईतील एका नाणावलेल्या संस्थेची धुरा सोपवली जाते ही बाबच शिंदे यांना आश्चर्याचा धक्का वाटते खरी, पण हा त्यांच्यातील गुणवत्तेचा हा सन्मान असल्याची भावना त्यांच्या सहकाऱ्यांमध्येही आहे. महाविद्यालयाला विद्यापीठाचा दर्जा मिळवून देणे हे ध्येय उराशी बाळगून शिंदे यांची पुढची वाटचाल राहणार आहे. शिवाय १८६९ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षही शिंदे यांच्या प्राचार्य पदाच्या कार्यकाळातच येत आहे हे विशेष. कर्तबगारीच्या बळावर संस्थेतील उच्चपदावर झालेली नेमणूक डॉ. राजेंद्र शिंदे हे सार्थ ठरवणार यात शंकाच नाही. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा!