
पुणे पोलीस दलाच्या सहपोलिस आयुक्तपदी संदीप कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यमान सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांची मुंबईत राज्य मानवी हक्क विभागाचे प्रमुख म्हणून बदली करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाकडून बुधवारी रात्री उशिरा बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बृहन्मुंबई पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची सहपोलिस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.
पुणे सहपोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांची राज्य मानवी हक्क विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून संदीप कर्णिक हे पुण्याचे नवे सहपोलिस आयुक्त म्हणून जबाबदारी घेणार आहेत. याआधी त्यांनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणुन काम केले आहे. त्याशिवाय मुंबईसह विविध ठिकाणी त्यांनी कामकाज पाहिले आहे. दरम्यान, डॉ. रवींद्र शिसवे हे जवळपास तीन वर्ष सहपोलिस आयुक्त म्हणून कार्यरत होते. कोरोना कालावधीत विविध योजना आणि उपक्रम त्यांनी राबविले होते. विशेषतः गणपती बंदोबस्त, कोरोना नियमावलीची अमलबजावणी करण्यात त्यांनी विशेष काम केले.


























































