
शिंदे गटाचे खासदार संदिपान भुमरे यांना चालक जावेद रसूल शेखच्या रूपाने ‘इकास’ सापडला आहे! गेल्या वर्षी या जावेद शेखला हैदराबादच्या सालारजंगाने शहराच्या हृदयस्थानी असलेली 150 कोटी रुपयांची तीन एकर जमीन भेट म्हणून दिली होती. आता जटवाडा भागातील समृद्धी महामार्गासाठी संपादित झालेल्या 23 एकर जमिनीचा हिबानामा जावेद शेख याच्या नावाने करून देण्यात आला आहे. आजघडीला बाजारभावाप्रमाणे या जमिनीची पिंमत 1150 कोटी रुपये आहे.विशेष म्हणजे या जावेद शेखचा जन्म 1985चा असून हिबानामा त्याच्या जन्माच्या अगोदर म्हणजे 1971ला करण्यात आला आहे. शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी संदिपान भुमरे यांचा हा जमीन घोटाळा उघड केला असून या संपूर्ण प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील जटवाडा, जोगवाडा येथील लता सूर्यभान वाघमारे यांचे खापर पणजोबा पावण्या भिका वाघमारे यांची जुना गट क्रमांक 174मध्ये 23 एकर 3 गुंठे जमीन होती. हैदराबाद संस्थान कायद्यानुसार 31 ऑक्टोबर 1957पासून प्रमाणपत्र देऊन ही जमीन बहाल करण्यात आली. पावण्या वाघमारे यांच्या मृत्यूनंतर ही जमीन कित्येक वर्षे पडीक राहिली. वारसा हक्कानुसार लता सूर्यभान वाघमारे आणि इतर नऊ कुळांमध्ये ही जमीन विभागली गेली. त्यापैकी तीन एकर तीन गुंठे जमीन लता वाघमारे यांच्या वाटय़ाला आली. 1971मध्ये महाराष्ट्र विकास महामंडळासाठी या जमिनीचे संपादन करण्यात आले. समृद्धी महामार्गाला खेटूनच असलेल्या या जमिनीला आता सोन्याचा भाव आला आहे. जमीन संपादनाच्या मोबदल्यात मूळ मालकाच्या कूळ वारसदारांना मोबदला 1150 रुपये देणे बाकी आहे. यासंबंधी महसूलच्या सहाय्यक आयुक्तांनी 23 जुलै 2025 रोजी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल देण्याचे कळवले होते. समृद्धी महामार्गाचे सक्षम अधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांनी हैदराबाद कूळ कायदा 1950च्या कलम 38 (ब)नुसार जावेद रसूल शेख याच्या नावे 1971मध्येच 23 एकर जमिनीचा हिबानामा करून दिल्याचे कळवले.
हिबानामा म्हणजे दानपत्र. इस्लामी कायद्यात हिबानामाची अशीच व्याख्या करण्यात आली आहे.
पहिल्या जमीन व्यवहारातही महसूल बुडाला
काल्डा कॉर्नरच्या जमीन व्यवहारात हिबानामा करण्यात आला. जर थेट खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला असता तर जवळपास 10 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरावे लागले असते. हे पैसे बुडवण्यासाठी हिबानामा करण्यात आला. पण महसूल प्रशासन यावर मिठाची गुळणी धरून बसले. आता दुसऱ्या प्रकरणातही हिबानामाच करण्यात आला. शंभर रुपयांपेक्षा जास्त मूल्य असेल तर हिबानाम्याची अधिकृत नोंदणी करणे बंधनकारक आहे. दोन्ही व्यवहारातील हिबानाम्याची अधिकृत नोंदणीच झालेली नसल्याची धक्कादायक माहिती आहे.
जन्माच्या 14 वर्षे अगोदर कोटय़वधींची जमीन बक्षीस!
संदिपान भुमरे यांचा चालक जावेद रसूल शेख याचा जन्म 1985चा आहे आणि त्याला जन्माच्या 14 वर्षे अगोदर म्हणजे 1971मध्ये तब्बल 23 एकर जमीन बक्षीस म्हणून मिळाली. खासदार भुमरे यांच्याच चालकाला कोटय़वधी रुपयांच्या जमिनी ‘हिबानामा’ करून मिळत असल्याचे कोडे कुणालाही पडले नाही. जिल्हा प्रशासन, महसूल, ज्यांच्या नावाने जमीन संपादन आहे त्या महाराष्ट्र विकास महामंडळाला यासंदर्भात काहीही माहिती नसावी, हेदेखील आश्चर्यच आहे.

































































