अंदाजपत्रकावरून स्थायी समिती सभेत गदारोळ, सांगली मनपा प्रशासनाने तयार केलेले अंदाजपत्रक काँग्रेसने फाडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या अंदाजपत्रकास स्थायी समितीकडून विलंब झाल्याने काँग्रेसचे स्थायी सदस्य संतोष पाटील सभेत निषेध व्यक्त केला. सत्ताधारी भाजप व प्रशासन मनमानी करत असल्याचा आरोप करत त्यांनी सभेतच प्रशासनाने तयार केलेला अंदाजपत्रक फाडून टाकले. तर, रमामातानगरमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न न सोडविल्याने काँग्रेसचे सदस्य फिरोज पठाण यांनी सभात्याग केला.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. महापालिका प्रशासनाने अंदाजपत्रक तयार करून स्थायी समितीकडे सादर केले आहे. मात्र, स्थायी समितीकडून अद्याप अंदाजपत्रक तयार केले नाही. अंदाजपत्रकास टाळाटाळ होत असल्याचा आरोप काँग्रेसचे विरोधी पक्षनेते संजय मेंढे यांनी केला होता. मंगळवारच्या सभेत काँग्रेसचे सदस्य आक्रमक झाल्याचे चित्र होते. नगरसेवक संतोष पाटील यांनी अंदाजपत्रकास विलंब झाल्याचा मुद्दा उपस्थित केला.

31 मार्चपूर्वी अंदाजपत्रक महासभेकडून मंजूर होणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापि अंदाजपत्रक तयार झालेले नाही. त्यात प्रशासनाने आयुक्तांच्या अंदाजपत्रकानुसार निधी खर्च करण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाकडून गतवर्षीच्या जमा-खर्चाचे विवरणपत्रही स्थायीकडे आलेले नाही. सत्ताधारी भाजप व प्रशासन मनमानी करीत असल्याचा आरोप करीत त्यांनी सभेत आयुक्तांनी तयार केलेले अंदाजपत्रक फाडले. सभापती सूर्यवंशी यांनी येत्या आठ दिवसांत अंदाजपत्रक महापौरांकडे देणार असल्याचे सभेत सांगितले.

काँग्रेसचे सदस्य फिरोज पठाण यांनी रमामातानगर, सहारा चौक, शमू पटेल गल्ली, माने गल्लीसह नऊ गल्ल्यात चार महिन्यांपासून पिण्याचे पाणी येत नाही. टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. पाणीपुरवठा विभागाने रस्त्यावर खड्डे काढले; पण तेही बुजविलेले नाही. तातडीने मार्ग काढा, अशी मागणी करीत सभेचे कामकाज रोखून धरले. प्रशासनाकडून अपेक्षित उत्तर न आल्याने त्यांनी सभात्याग केला. त्यानंतर सभापती सूर्यवंशी यांनी त्यांना अडवले. तातडीने ठेकेदाराला बोलावून घेतले. या परिसरातील नागरिकांसाठी नवीन जलवाहिनीचे काम हाती घेण्याचे आदेश दिले.

मान्सूनपूर्व नालेसफाईचा विषय प्रलंबित
– मान्सूनपूर्व नाले सफाईसाठी 1 कोटी 21 लाखांची निविदा काढण्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याने स्थायी समितीच्या मंगळवारच्या सभेत हा विषय प्रलंबित ठेवण्यात आला. तर खणभागात अद्याप फिश मार्केटसाठी 8 कोटींचा आराखडा तयार करणे, कुपवाडमधील स्व. मदनभाऊ मिनी क्रीडांगणाच्या कंपाऊंड भिंतीच्या 75 लाखांच्या निविदा मंजुरीसह इतर कोटय़वधी रुपयांच्या कामांना स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली.

स्वच्छता निरीक्षकांना नोटीस

– महापालिकेकडून नवीन शौचालयासाठी अनुदान दिले जाते. मात्र, सध्या अनुदान बंद असल्याचे स्वच्छता निरीक्षकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांकडून प्रस्ताव दाखल होत नसल्याची बाब नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी निदर्शनास आणून दिली. यावर सभापतींनी संबंधित स्वच्छता निरीक्षकांना नोटीस काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले. तसेच, नवीन शौचालयासाठी अनुदान वाटप सुरू असून, नागरिकांनी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहनही त्यांनी केले.