केंद्रीय पथकाकडून दोन महिन्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी, एनडीआरएफच्या निकषानुसार मदत मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नुकसानीचा आढावा केंद्रीय पथकाकडून तब्बल दोन महिन्यांनी आज घेण्यात आला. यावेळी नुकसानग्रस्तांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत मिळेल, अशी ग्वाही पथकाचे प्रमुख रेवनीष कुमार यांनी दिली.

जुलै महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार अतिवृष्टी होऊन महापुराचा विळखा पडला होता. शहरासह ग्रामीण भागात याचा सर्वांनाच तडाखा बसला होता. या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आज वरिष्ठ सनदी अधिकारी रेवनीष कुमार यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय पथक दाखल झाले. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा सादर केला.

जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान 1 हजार 772 मि.मी. असून, यावर्षी आजपर्यंत 1 हजार 64 मि.मी. पाऊस झालेला आहे. 22 ते 25 जुलै या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. त्यामुळे आलेल्या महापुराचा 409 गावे व त्यातील 72 हजार 411 कुटुंबांना फटका बसला. शाहूवाडी, पन्हाळा, करवीर, राधानगरी, भुदरगड व गडहिंग्लज या तालुक्यातील रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक गावांत भूस्खलन झाल्याची माहिती जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिली. या कालावधीत राधानगरी, चंदगड प्रत्येकी 2, तर कागल व भुदरगड प्रत्येकी 1 असे एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असून, त्यांना प्रत्येकी 4 लाखप्रमाणे 24 लाख रुपये, तसेच दुधाळ जनावरे 81, लहान जनावरे 37 व 1 हजार 874 पोल्ट्रीसाठी 30 लाखांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

महापुरामुळे बाधित झालेल्या 409 गावांतील घरांचे व जनावरांच्या गोठय़ांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असून, यासाठी किमान 18 कोटी 72 लाख रुपयांची आवश्यकता आहे. हँडक्राफ्ट, हॅण्डलूमसाठी 1 कोटी 30 लाख, छोटे दुकानदार व व्यावसायिकांसाठी 53 कोटी 95 लाख, मत्स्य व्यावसायिकांच्या नुकसानीपोटी 6 कोटी 44 लाख, पिकांच्या नुकसानीसाठी सुमारे 94 कोटी 52 लाख तसेच कृषी योग्य जमिनीच्या नुकसानीसाठी 4 कोटी 13 लाखांची आवश्यकता आहे. पुरामुळे विविध विभागांच्या मालमत्तेचे झालेले नुकसान एकूण 226 कोटी 48 लाख रुपये असल्याची माहिती जिल्हाधिकारी रेखावार यांनी दिली.

महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांनीही महापालिका क्षेत्रात महापुरामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली. या केंद्रीय पाहणी पथकाचे प्रमुख रेवनीष कुमार यांनी एनडीआरएफच्या निकषानुसार मदत मिळेल, अशी ग्वाही दिली. यावेळी नागपूर येथील जलशक्तीचे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे, नवी दिल्ली येथील ऊर्जा विभागाच्या उपसंचालक पूजा जैन, मुंबई येथील रस्ते परिवहन विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र चापेकर, प्रताप जाधव असे या पथकातील अन्य सदस्य तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, अपर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

निकषात बदल करून मदत करा – खासदार धैर्यशील माने

शिवसेनेचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय पथकाची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेत अतिवृष्टी व महापुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्य़ांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती दिली. एनडीआरएफच्या निकषांनुसार मिळणारी मदत खूप कमी असून, ती झालेल्या नुकसानीप्रमाणे मिळावी, यासाठी निकषात बदल करण्याची शिफारस केंद्रीय पथकाने करावी. मदतीसाठी व पुनर्वसनासाठी एक राष्ट्रीय धोरण असावे, अशी मागणी त्यांनी केली.

शिरोळ, कुरुंदवाड व नृसिंहवाडी येथे पाहणी

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय पाहणी पथकाने अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झालेल्या शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड व नृसिंहवाडी येथील शेती पिके, घरे व दुकानांची पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्य़ांनी मागील तीन वर्षांपासून नियमितपणे पूर येत असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, तसेच वेळेत सानुग्रह अनुदान द्यावे, अशी मागणी केली. या भागातील सर्व शेतीपिके किमान दहा ते पंधरा दिवस पुराच्या पाण्याखाली होती. ऊस वरून हिरवा दिसत असला, तरी आतून पूर्णपणे सडला आहे. त्याचा काढणी खर्चही करू शकत नसल्याची व्यथा शेतकऱ्य़ांनी या पथकासमोर मांडली.

आयर्विन पुलावरून केली नुकसानीची पाहणी

पूर व भूस्खलनामुळे सांगली जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी आज केंद्रीय पथकाने केली. यावेळी पथकाने सांगलीतील आयर्विन पुलावर जाऊन माहिती घेतली. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पथकाला पूरस्थितीची आणि नुकसानीची माहिती दिली. जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यावेळी उपस्थित होते. जुलै महिन्यात आलेल्या महापुरानंतर झालेल्या नुकसानीची आणि भूस्खलनाची माहिती घेण्यासाठी केंद्रीय पथक आज सांगलीत दाखल झाले. पहिल्यांदा जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्य़ांकडून आढावा घेतल्यानंतर केंद्रीय पथकाच्या सदस्यांनी सांगलीतील आयर्विन पुलावर जाऊन माहिती घेतली. यावेळी मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी संपूर्ण परिस्थितीची नकाशाद्वारे पथकाला माहिती दिली. महापुरात आयर्विन पूल आणि आजूबाजूला पाण्याची काय स्थिती होती याची माहिती पथकातील सदस्यांना दिली. यावेळी मनपाचे उपअभियंता वैभव वाघमारे आणि महेश मदने उपस्थित होते.