Sangameshwar News – किरकोळ वादातून मित्रानेच केला खून, आंबा घाटात अपघाताचा बनाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाट परिसरातील दख्खन (कळकदरा) येथे 31 मार्चला घडलेल्या एका घटनेला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. मित्र मोटारीतून पडल्याचा आणि अपघाताचा बनाव रचणारा मित्रच प्रत्यक्षात खुनी असल्याचे तपासात पुढे आले आहे. याप्रकरणी देवरुख पोलिसांनी संशयित आशीष शांताराम भावके (वय 27, रा. घोगाव, ता. कऱ्हाड) याला सोमवारी रात्री उशिरा अटक केली. न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. खून झालेल्याचे नाव सुधीर अर्जुन यादव (वय 30, रा. साईकडे, ता. पाटण) असे आहे.

सातारा जिल्ह्यातील सुधीर अर्जुन यादव (वय 30, रा. साईकडे, ता. पाटण) आणि आशीष शांताराम भावके (27, रा. घोगाव, ता. कऱ्हाड) हे मित्र असून एकमेकांचे नातेवाईकही आहेत. हे दोघे रत्नागिरी येथे फिरायला आले होते. ‘आरे-वारे’ समुद्रकिनारी त्यांनी जेवण केले. तिथून परतत असताना 31 मार्चला रात्री साडेअकराच्या सुमारास आंबा घाटातील कळकदरा येथे त्यांच्यात वाद झाला. मृत सुधीर यादव याने पुन्हा दारू पिण्याचा हट्ट धरल्याने दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. संतापलेल्या सुधीरने आशीषच्या मोटारीच्या बोनेटवर चढून काच फोडली आणि नुकसान केले. याचा राग अनावर झाल्याने आशीषने त्याच अवस्थेत मोटार भरधाव चालवून सुधीर मोटारीच्या बोनेटवरून खाली पडला. काही अंतर फरपटत गेल्याने त्याच्या बरगड्या, पोट आणि पायाला गंभीर दुखापत झाली. जखमी सुधीरला तशाच अवस्थेत सोडून आशीष पसार झाला होता. दुसऱ्या दिवशी सुधीरला साखरपा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा केवळ अपघात असल्याचा बनाव रचला होता. मात्र, देवरुखचे पोलिस निरीक्षक उदय झावरे यांनी केलेल्या चौकशीत हा अपघात नसून रागाच्या भरात केलेला गुन्हा असल्याचे समोर आले.