नवदाम्पत्याने वादातून संपवले जीवन ! संगमनेरमध्ये खळबळ

पठार भागातील सख्ख्या चुलत बहिणींच्या आत्महत्येची घटना ताजी असतानाच संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरात एका नवदाम्पत्याने आत्महत्या केल्याच्या घटनेने संगमनेरमध्ये खळबळ उडाली आहे. रविवार (दि. 7) दुपारी ही घटना उघडकीस आली आहे.

वैष्णवी संजय खांबेकर (वय 22, रा. घोडेकर मळा), पती कुलदीप सुनील अडांगळे (वय 35, रा. इंदिरानगर) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

संगमनेर शहरातील जय जवान चौकात रहायला असलेल्या या प्रेमीयुगुलाच्या व्यक्तिगत वादाचे रूपांतर कडाक्याच्या भांडणानंतर टोकाचे पाऊल उचलत दोघांनी जीवनयात्राच संपविली.

इंदिरानगर येथील घरामध्ये वैष्णवी खाली पडल्याचे, तर त्याच ठिकाणी कुलदीप याचा मृतदेह पंख्याला लटकला असल्याचे पोलिसांनी सांगितले. वैष्णवी आणि कुलदीप यांचा दोन वर्षांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता. परंतु, सततच्या वादातून ही घटना घडली. या घटनेनंतर दोघांना ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी येथे तपासणीसाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कुलदीपच्या शवविच्छेदनानंतर काल (दि. 7) सायंकाळी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर, वैष्णवी संजय खांबेकर हिचा मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी लोणी प्रवरानगर येथे पाठवण्यात आला. फॉ रेन्सिक अहवालानंतर घटनेचा उलगडा होणार आहे. याबाबत शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैष्णवी हिच्यावर संगमनेर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष पगारे तपास करीत आहेत.