मी वेगळी

3944

>> संगीता कर्णिक, उल्हासनगर

बर्‍याचदा आपल्याकडे एखादी कला असते, पण त्याची आपल्याला जाणीव नसते. नकळत कुणाच्या तरी बोलण्यातून ती कला अचानक बाहेर पडते आणि त्यातच मग आपलं करीअर घडतं. माझ्या बाबतीत नेमकं तसंच झालं. मी इन्स्टमेंट टेक्निशियनचा आयटीआय कोर्स केला होता. त्यावर मला जॉबही मिळाला, पण लग्नानंतर घरात दोन्ही मुलींना बघायला कुणी नसल्याने 2001 मध्ये नोकरी सोडावी लागली.

काही वर्षे मुलींच्या पालनपोषणात निघून गेली, पण काहीतरी करायची इच्छा आहे, ऊर्मी आहे असं वाटत होतं, पण काय करायचं ते कळत नव्हतं. एकदा अचानक मामेभाऊ म्हणाला, ‘‘अगं, तुझ्या हाताला एवढी चव आहे तर एखादं छोटंसं हॉटेल का काढत नाहीस?’’ तो ते गमतीने बोलला असला तरी माझ्या मनात ते क्लिक झालं. आपण छान स्वयंपाक करू शकतो, हे आपल्या कधी लक्षातच कसं आलं नाही? मी ठरवलं… आणि कॅटरिंगच्या ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली. माझे पती मिलिंद यांचीही पावलोपावली मला साथ आहे.

घर सांभाळताना, मुलींचं पालनपोषण करताना आता मी वेगळी व्हायचं ठरवलंय. आता पूजा, वाढदिवस, साखरपुडे, जेवणाच्या ऑर्डर्स घेते. माझ्या हाताला चांगली चव असल्याने एकदा मिळालेली ऑर्डर पुनः पुन्हा येतच राहते. अशा ऑर्डर्स आता वाढायला लागल्यात. आता ‘पिपासा कॅटरिंग’ नावाचं छोटंसं दुकान उघडायचं मनात आहे. मला भरपूर ऑर्डर्स मिळतात, पण करायला जागा नाही. ती एकदा मिळाली की, त्या ऑर्डर्सही घेता येतील.

प्रत्येकीचं स्वतःचं वेगळेपण असतं. आपलं करीयर, छंद, घर, संसार, नवरा, मुलंबाळं… या साऱयांच्या पलीकडे… फक्त ते गवसणं आवश्यक असतं. अंतर्मुख होऊन थोडा स्वतःच शोध घेतला की ते वेगळेपण सापडतं. तुमच्यातील हे वेगळेपण शोधायला ‘श्रीमती’ही तुमच्या मदतीला आली आहे. चला तर मग… लेखणी उचला आणि तुमचे वेगळेपण फोटोसहित आम्हालाही कळवा. वेगळेपणास नावासहित प्रसिद्धी मिळेल.

आमचा पत्ता : श्रीमती, शेवटचे पान, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025 किंवा [email protected] या ईमेलवरही पाठवता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या