सांगलीत 80 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप, 16 कारखान्यांकडून 82 लाख क्विंटल साखर उत्पादन; आठवडाभरात गाळप बंद होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चालू वर्षी अनेक अडचणींचा सामना करीत ऊस गाळप हंगाम सुरू झाला होता. अखेर तीन महिन्यांनंतर जिह्यातील साखर कारखान्यांचे गाळप हंगामाचे या आठवडय़ात सूप वाजणार आहे. जिह्यात 16 साखर कारखान्यांनी 80 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, 82 लाख 739 क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. या साखर कारखान्यांचा सरासरी साखर उतारा 10.53 टक्के राहिला आहे. सोनहिरा साखर कारखान्याने सर्वाधिक गाळप, तर राजारामबापू साखर कारखाना वाटेगाव युनिटने सर्वाधिक साखर उतारा घेतला. आत्तापर्यंत दहा कारखान्यांचा हंगाम बंद झाला असून, या आठवडय़ात उर्वरित कारखाने बंद होणार आहेत.

सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणेचे बारमाही पाणी तसेच दुष्काळी भागात सिंचन योजनेच्या पाण्यामुळे वाढलेले उसाचे क्षेत्र यातून उसाची लागवड वाढली होती, पण यावेळी सलग सात-आठ महिने पावसाने गोंधळ केल्याने ऊसशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. मेपासून सुरू झालेला पाऊस हंगाम सुरू झाला तरी सुरूच होता. या हंगामासाठी सुरू, खोडवा मिळून एकूण जिह्यात सर्वाधिक ऊसक्षेत्र वाळवा तालुक्यात होते. या ठिकाणी 31 हजार 274 हेक्टर ऊस गाळपासाठी उभा होता.

सन 2024-25 मध्ये जिह्यात 17 साखर कारखान्यांनी 77 लाख 6 हजार 300 टन उसाचे गाळप करून 81 लाख 46 हजार 890 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते, तर या कारखान्यांचा सरासरी साखर उतारा हा 13.25 टक्के राहिला होता. चालू गळीत हंगामाची सुरुवातच काहीशा विलक्षण स्थितीत झाली. हंगामासाठी सांगली जिह्यात जवळपास 1 लाख 38 हजार 902 हेक्टर ऊसक्षेत्र उपलब्ध होता. हा ऊस वेळेत गाळपाचे कारखान्यांसमोर आव्हान होते. मात्र, यावेळी मे महिन्यापासूनच पावसाने सुरुवात केली होती. त्याचा ऊसशेतीला फार मोठा फटका बसला, परिणामी एकरी ऊस उत्पादनात घट होणार हे निश्चित होते आणि तसेच झाले.

यंदा 2025-26च्या हंगामात सोळा साखर कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला आहे. यात 10 सहकारी कारखान्यांनी 55 लाख 66 हजार 930 टन ऊसगाळप केले असून, 59 लाख 9 हजार 575 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या कारखान्यांचा साखर उतारा 10.62 टक्के आहे. याशिवाय जिह्यातील एकूण 6 खासगी साखर कारखान्यांनी आजअखेर 22 लाख 52 हजार 62 टन उसाचे गाळप केले असून, 22 लाख 92 हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे.सन 22-24 मध्ये जिह्यात 1 लाख 24 हजार 289 हेक्टर क्षेत्रात ऊस होता, तर 23-24 च्या हंगामात 1 लाख 44 हजार 127 हेक्टर ऊसक्षेत्र होते. 24-25 मध्ये झाली. अवघा 1 लाख 37 हजार हेक्टरमध्ये ऊस होता. आता 25-26 साठी 1 लाख 38 हजार 902 हेक्टर ऊस गाळपासाठी उपलब्ध होता. या हंगामासाठी साखराळे, वाटेगाव, कारंदवाडी, जत युनिट, विश्वास, हुतात्मा, सोनहिरा, क्रांती, दालमिया, सांगली दत्त इंडिया, नागेवाडी, श्री श्री राजेवाडी, उदगिरी, मोहनराव शिंदे आरग आणि श्रीपती शुगर्स, केन ऍग्रो आदी कारखान्यांनी गाळप घेतले.

आता या हंगामात गाळपाचा अखेरचा टप्पा सुरू झाला आहे. जास्तीत जास्त आठवडाभर कारखाने चालतील, असे चित्र आहे. यावेळी डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने गाळपात आघाडी घेतली असून, या ठिकाणी 9 लाख 73 हजार 41 टन उसाचे गाळप होऊन 8 लाख 52 हजार 50 क्लिटंल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. साखर उतारा 8.43 टक्के राहिला आहे. मात्र, साखर उताऱयात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वाटेगाव युनिटने आघाडी घेतली असून, येथे तब्बल 12.53 तर कारंदवाडी युनिटने 12.48 टक्के साखर उतारा मिळविला आहे.