
अबब! कोथिंबीरची जुडी 20 हजार रुपये… हे खरं एका नारळाची किंमत 41 हजार रुपये, तर वाटत नाही ना? पण सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील शिरगावात या दराने ही खरेदी केली गेली आहे. मात्र, या दरामागे श्रद्धा आणि भक्ती आहे. शिरगावातील पारायण सोहळ्यानंतर लिलावात ग्रामस्थांची भक्तिभावाची ही चढाओढ पाहायला मिळाली.
वाळवा तालुक्यातील शिरगावातील सिद्धेश्वर मंदिरात दरवर्षी हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा पार पडतो. यंदा हरिनाम सप्ताहाचे 98 वे, तर पारायणाचे 42 वे वर्ष साजरे होत आहे. आठवडाभर गावातील स्त्री, पुरुष, आबालवृद्ध काकड आरती, हरिपाठ, भजन, कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रमात मोठ्या आनंदाने सहभागी झाले होते. पारायणाच्या शेवटच्या दिवशी पुरणपोळीचा महाप्रसाद झाला. या दिवशी गावात कुठेही चूल पेटवली जात नाही. गावातील महिला महाप्रसादाची तयारी करतात. तर सर्व पशुपालक तब्बल एक हजार लिटर दूध दान करतात. पंचक्रोशीतील हजारो भक्त या दिवशी शिरगावात दर्शनासाठी गर्दी करतात.
सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे
पारायणानंतर उरलेल्या साहित्यांचा लिलाव होतो. द्रोण, पत्रावळी, पडदे, रिकामे डबे अशा साहित्यांना ग्रामस्थ उत्साहाने बोली लावतात. या वस्तू खरेदी केल्याने सिद्धेश्वराचा आशीर्वाद लाभतो, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. एकूण लिलावातून एक लाख 76 हजार 900 रुपये जमा झाले असून, ही रक्कम मंदिराच्या विकासासाठी वापरली जाणार आहे. यावेळी सिद्धेश्वर सेवा मंडळ पदाधिकारी ग्रामस्थ आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यंदाच्या लिलावातील ठळक बोली
मानाचा नारळ 41 हजार रुपये, कोथिंबीर जुडी 20 हजार रुपये, शिल्लक चटणी 17 हजार रुपये, तांदूळ 13 हजार, गहू 12 हजार, हरभरा डाळ 9 हजार 500 रुपये, गूळ 8900, तेल व रिकामे डबे 7900, ज्वारी 5000, तूप 3200, चहा पावडर 4100 रुपये असे एकूण या लिलावात एकूण एक लाख 76 हजार 901 रुपये जमा झाले. वस्तूच्या किमतीपेक्षा इथे श्रद्धेला अधिक मोल दिले जाते, हेच यावरून स्पष्ट होते.