महापुराची कारणे आणि उपाय शोधण्यासाठी सांगलीत शनिवारी पूरपरिषदेचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापुराची कारणे आणि उपाय शोधण्यासाठी सांगलीत शनिवारी (दि. 21) पूरपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, निवृत्त सचिव राजेंद्र पवार, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पृथ्वीराज पाटील यांनी आज दिली. पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने या पूरपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

सन 2005, 2019 आणि आता 2021 या वर्षांत कृष्णा, कोयना, वारणा, पंचगंगा आणि अन्य नद्यांना आलेल्या महापुरामुळे सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात एकच हाहाकार उडाला. महापुरामुळे शेती, जनावरे, घरे, दुकाने आणि अन्य गोष्टींचे प्रचंड नुकसान झाले. वारंवार असा पूर येऊ लागला तर हे संकट कसे परतवून लावायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी महापुराची कारणे आणि उपाय यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने शनिवार (दि. 21) दुपारी चार वाजता पूरपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या हॉलमध्ये ही परिषद होणार आहे. परिषदेचे ऑनलाइनही प्रसारण करण्यात येणार आहे. परिषदेचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून जलसंपदामंत्री जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत, असे असे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.