
‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या जनजागृतीसाठी सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘ग्रीन दिवाळी’ हा फेस्टिव्हल राबविणार आहे. या फेस्टिव्हलअंतर्गत ‘फटाकेमुक्त दिवाळी’ अभियान राबविण्यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांकडून ‘ई-शपथ’ घेतली जाणार आहे. या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी मनपा क्षेत्रात 40 नोडल अधिकाऱयांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.
‘माझी वसुंधरा’ या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने आयुक्त नितीन कापडणीस यांच्या उपस्थितीत महापालिका अधिकाऱयांची बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त दत्तात्रय लांघी, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
आयुक्त कापडणीस म्हणाले, शासनाच्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या जनजागृतीसाठी आणि दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे वायुप्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेकडून दिवाळीत ‘ग्रीन दिवाळी’ फेस्टिव्हल मनपा क्षेत्रातील शाळांमध्ये राबविला जाणार आहे. या फेस्टिव्हलमध्ये महापालिकेकडून नेमण्यात आलेले 40 नोडल ऑफिसर हे शाळांमध्ये जाऊन ‘माझी वसुंधरा’ अभियानाची माहिती देणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांमध्ये फटाकेमुक्त दिवाळीबाबत जागृती करणार आहेत. याचबरोबर शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून ‘ई-शपथ’ही घेतली जाणार आहे.
महापालिकेच्या या ‘ग्रीन दिवाळी’ फेस्टिव्हलच्या माध्यमातून यंदाच्या दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे वायुप्रदूषण रोखण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी येणारी दिवाळी ही फटाकेमुक्त दिवाळी म्हणून साजरी करून वायुप्रदूषण रोखण्यास सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त कापडणीस यांनी केले आहे.

























































