
सलग चोवीस तास बॅटिंग आणि हातातोंडाशी आलेले खरीप पीक उद्ध्वस्त करून नागरी वस्तींत दाणादाण उडवत मोठा तडाखा देत शुक्रवारी पावसाने उसंत घेतली. दरम्यान, कोयना आणि वारणा धरणातून विसर्ग सुरू असल्याने कृष्णा आणि वारणा नद्या दुथडी भरून वाहत आहेत. मात्र, सांगलीत वेशीवरूनच पूर परत फिरला आहे. काल रात्रीपर्यंत कृष्णा नदीची पाणीपातळी 36 फुटांपर्यंत गेली होती, ती आज सायंकाळपर्यंत 32 फुटांवर आली आहे.
सांगली जिल्ह्यात सलग 24 तास संततधार पावसामुळे हातातोंडाशी आलेले खरीप पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. कोयना धरणातून सोडण्यात येणाऱया पाण्यामुळे कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाटय़ाने वाढ होत होती. त्यात पावसाचा जोर असल्याने नागरिक विशेषतः कृष्णाकाठचे नागरिक भयभीत झाले होते. मात्र, आज दुपारपासून या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. काल रात्रीपासून पाणीपातळीत होणारी वाढ आज दुपारनंतर कमी होऊ लागली आहे. आज सायंकाळी सहा वाजता कृष्णा नदीची पाणीपातळी 32 फुटांवर स्थिर होती.
सांगली शहरातील गुंठेवारी भागात या पावसाने दाणादाण उडवली आहे. सांगली, मिरज शहरांतील जवळपास तीन हजार घरांत पाणी घुसले आहे. सांगली शहरातील श्यामरावनगर, धामणी रस्ता, कोल्हापूर रस्ता परिसरात पाणीच पाणी झाले आहे. झुलेलाल कॉलनीपासून देवेंद्र सोसायटी, महसूल कॉलनी, आदित्य कॉलनी, जनता बँक कॉलनी, रॉयल कॉलनी, महादेव कॉलनी, तक्षशिला परिसर, कालिकानगर, रुक्मिणीनगर परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
पुरामुळे आठजणांचा मृत्यू
सांगली जिल्ह्यात माणगंगा, अग्रणी, धोम, कृष्णा, वारणा अशा छोटय़ा-मोठय़ा नद्यांना पूर आलाच. त्याचबरोबर जिल्ह्यातील ओढे, नाले, तलाव तुडुंब भरून वाहू लागले. जिल्ह्यात जिकडे बघाल तिकडे पाणीच पाणी झाले होते. या निसर्गाच्या कोपामुळे जिल्ह्यातील आठजणांचा वाहून जाऊन मृत्यू झाला आहे.





























































